
वडांगळी (प्रतिनिधी )मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अभिनव बाल विकास मंदिर वडांगळी या विद्यालयात आज इयत्ता पाचवी मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात करण्यात आले. शासनामार्फत मोफत पाठ्यपुस्तके इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिली जातात त्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश दादा खुळे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सुनिता अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश दादा खुळे होते. माध्यमिक पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष खंडेराव खुळे अभिनव बालविकास मंदिर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विक्रम भास्कर खुळे, स्कूल कमिटी सदस्य गणेश भाऊ कडवे, मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार, पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक, सुभाषराव ठोक ,विजय कोकाटे, संदीपराव म्हस्के, श्रीमती आशालाता पाटील, कैलास काळे, रामकृष्ण सानप आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम.सुनिता अहिरे, सुदेश दादा खुळे, खंडेराव खुळे, विक्रम खुळे यांच्या हस्ते नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार यांनी केले. तसेच विस्तार अधिकारी श्रीम. सुनिता अहिरे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत आलं पाहिजे आणि नियमितपणे अभ्यास केला पाहिजे . अध्यक्ष स्थानावरून बोलताना सुदेश दादा खुळे म्हणाले की, आपली शाळा परिसरातील एक आदर्श आणि नावाजलेली शाळा आहे . नवीन आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमध्ये असलेल्या सोयी सुविधांचा लाभ घेऊन अभ्यास करावा आणि चांगल्या गुणांनी पास व्हावं असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकरराव सांगळे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन बाळासाहेब सांगळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
