रमाकांत नारायणे, मुंबई

फादर्स डे च्या निमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा! आपण आईची महती लहानपणापासून पाहत आलेलो असतो आणि वेगवेगळ्या लेखातून वाचतो आणि कवितांमधून ऐकत आलेलो असतो. आईवर लिहिलेल्या श्री. संकर्षण कराडे यांच्या कविता आपण अलीकडे खूप ऐकतो. परंतु संकर्षण कराडे यांनी अद्याप महान बापावर कविता केल्याचे ऐकिवात नाही. असो!
परंतु बापाची ही मुलांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका असते, ती मात्र मुलांना कळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ज्यांना बापाची महती काय असते हे ऐकायचे असल्यास बाबा महाराज सातारकर यांची बाप व्हावा ऐसा ही एक ऑडिओ कॅसेट पूर्वी १९९८-२००० च्या दरम्यान निघाली होती. त्यात त्यांनी बापाची महती फार उत्तमरीत्या सांगितली आहे. ते म्हणतात…
एका जेवणाची काळजी करते ती आई ।
आणि आयुष्याच्या जेवणाची काळजी करतो तो बाप ।
मुलाच्या समोर रडते ती आई ।
आणि रात्री डोकं उशीत खुपसून रडतो तो बाप ।
ही कॅसेट मी अनेक वेळा पूर्वी ऐकली आहे आणि हमसून रडलो आहे. आपल्यालाही कॅसेट ऐकायला मिळाल्यास जरूर ऐका.
बापल्योक नावाचा एक अतिसुंदर सिनेमा अलीकडेच मराठीत येऊन गेला. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा तो सिनेमा आहे आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाले आहेत. साधं, सोपं, सरळ असं त्याचं कथानक आहे. लग्नाची लग्नपत्रिका वाटण्याच्या प्रवासात मुलाला बापाची महती हळुवारपणे माहीत होत जाते आणि त्यांच्यात एक घट्ट असं नातं निर्माण होतं. सागर ( मकरंद काळे) हा पुण्यातील चांगली नोकरी सोडून बापाला शेतीत मदत करण्यासाठी गावाकडे येतो. त्याचं थोडं वय झालेलं असतं. लग्न जमणे तसं कठीण असतं परंतु लग्न जमत आणि तो बापाबरोबर ( शशांक शेंडे) लग्न पत्रिका वाटायला नातेवाईक आणि मित्र यांच्याकडे बाईकवर प्रवासाला निघतो. छोट्या छोट्या कारणासाठी त्यांचे वादविवाद होत असतात. परंतु जसा जसा सिनेमा पुढे सरकतो आणि वेगवेगळे नातेवाईक आणि मित्र यांना ते पत्रिका वाटतात आणि असे प्रसंग घडतात तेव्हा सागरला त्याच्या बापाची महती हळूहळू उलगडत जाते. नंतर त्यांच्यात आणि कुटुंबात एक घट्ट नातं निर्माण होतं आणि सिनेमाचा सुखद शेवट होतो. मी हा सिनेमा ॲमेझॉन प्राईम वर अनेक वेळा पाहिला. आपल्याला पाहायचा राहिला असेल तर प्राईम व्हिडिओ वर नक्की पहा, तो फ्री आहे. अलीकडे आलेला जुनं फर्निचर सिनेमाही बापाचे महती पटवून सांगणारा अतित्कृष्ट सिनेमा आहे. शेवटी तुकाराम महाराज यांच्या शब्दात…
जगीं ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुक्तिस जावा ॥१॥
पोटा येतां हरलें पापा । ज्ञानदेवा मायबापा ॥ध्रु.॥
मुळीं बाप होता ज्ञानी ।
तरी आम्ही लागलों ध्यानीं ॥२॥
तुका म्हणे मी पोटींचें बाळ । माझी पुरवा ब्रम्हींची आळ ॥३॥
रमाकांत नारायणे
१५-०६-२०२५
