
नाशिक (प्रतिनिधी) नाशिक- उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तुळजाभवानी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेस सामाजिक न्याय विभागाचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार मुंबई येथील शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा सौ उषाताई अशोक गालफाडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात 10 जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर रोहियो मंत्री ना.भरतशेठ गोगावले, जलसंधारण मंत्री ना.संजय राठोड, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी होते. असा पुरस्कार पटकावणारी तुळजाभवानी बहुउद्देशीय सेवाभावी ही जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. हा पुरस्कार म्हणजे संस्थेतर्फे राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहीम, विविध आरोग्य शिबिरांचे, आयोजन, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे केलेले आयोजन व त्यांना शालेय साहित्याचे वाटप

आदी उपक्रमांचा गौरव असल्याचे संस्थेच्या अध्यक्ष उषाताई गालफाडे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री सामाजिक न्यायमंत्री आदींच्या प्रमुख उपस्थितीत माझ्या संस्थेला हा पुरस्कार मिळाला आणि तो स्वीकारताना मला खूप आनंद झाला आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे दीनदुबळे तसेच वंचित घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध राहीन,अशी ग्वाही सुद्धा सौ. गालफाडे यांनी दिली.
