
नाशिक:- (प्रतिनिधी). आजकाल विवाह सोहळा म्हटलं की हौसेच्या नावाखाली काही अनावश्यक गोष्टी केल्याचे निदर्शनास येत असते. प्रतिष्ठेच्या स्पर्धेत वधू आणि वर दोहोंकडील परिवार अशी नाहक भरडला जात असतो. परंतु आजची पिढी आणि तरुणांनी आदर्श घ्यावा; असा अनोखा विवाह सोहळा नुकताच कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे संपन्न झाला. नाशिक तालुक्यातील पळसे गावातील वारकरी सांप्रदायिक ज्ञानेश्वर गायधनी यांचे पुत्र आणि कामगारनेते अशोकराव गायधनी यांचे पुतणे मृदूंगाचार्य हभप चि.ऋषिकेश आणि चासनळी येथील ज्येष्ठ पत्रकार भगीरथ गाडे यांची सुकन्या चि.सौ.का.श्वेता या दोन्ही वधुवरांनी शिवराज्याभिषेक दिनी ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करत विवाहमंडपात पाऊल टाकले. छ.शिवरायांना नमन करून सामूहिक शिवस्तुती घेत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला. दोन्ही परिवारांनी उपस्थितांना भक्तीशक्तीचे अनोखे दर्शन घडवून आणले. ऋषिकेश विद्युत अभियंता असून उत्तम मृदूंगाचार्य आहेत. त्यांच्या भगिनी रूपाली ठोंबरे नामवंत कीर्तनकार आहेत. वधू श्वेता याही विद्युत अभियंता आहेत. अशा उच्चशिक्षित वधुवरांसह त्यांच्या परिवाराने दाखवलेल्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे. सोहळ्यास महाराष्ट्रातील नामवंत वारकरी, दिग्गज गुणिजण तसेच सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
