
नाशिक.(प्रतिनिधी ) :-जीवन व्यवहारात कित्येकदा संकटे आपली पाठ सोडत नाहीत. मात्र या संकटांना संधी समजून आपण आपल्या आयुष्याचं मार्गक्रमण करत राहावे. संघर्षातूनच आशावाद निर्माण करत जीवन सुंदर बनवले पाहिजे, असे प्रतिपादन झोडगे (मालेगाव) येथील कवी हंसराज देसाई यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्स्वी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ‘बुरुज मनाचे बांधा’ या काव्यसंग्रहावर १५१वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका अलका दराडे होत्या. देसाई पुढे म्हणाले की, पूर्वीच्या काळी प्रत्येक माणूस जिव्हाळ्याची नाती जपत माणुसकी धर्माने वागत होता. आज मात्र माणूसपणाचे बुरूज ढासळू लागले आहेत. अशा विचारातून या संग्रहातील कवितांची निर्मिती झाली. आजची विदारक परिस्थिती कविमनाला बैचेन करते. मानवी मूल्ये जपत मनाचे ढासळलेले बुरुज सावरण्याची गरज आहे. कविता म्हणजे मानवी मूल्यांचा आविष्कार असतो. आईच्या कविता लिहून कवी होणे सोपे असते; पण त्याच आईला तो कवी सांभाळत नाही. हे दुर्दैव आहे. त्यासाठी कवीने स्वतः संवेदना जपल्या पाहिजे, असे सांगून साहित्यिकांनी प्रयोगशील बनून नवलेखकांना नवी दिशा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सुहास टिपरे आणि सोमनाथ साखरे यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन तर राजेंद्र उगले यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (१३) पिंपळगाव बसवंत येथील कवी सोमनाथ पवार ‘पोशिंदा’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
