
सिन्नर (प्रतिनिधी)जागतिक तापमान सतत वाढत असल्यामुळे माणसाचे आरोग्य धोक्यात येत आहे.त्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन मोहीम मोठ्या प्रमाणात राबविणे काळाची गरज आहे. वाढते प्रदूषण,प्लास्टिकचा अनिर्बंध वापर यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे त्यासाठी त्याचे संरक्षण व संवर्धन करणे आपली सामूहिक जबाबदारी व नैतिक कर्तव्य आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि: शाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते डॉ.श्यामसुंदर झळके यांनी केले.येथील भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित कार्यक्रमात ” जागतिक पर्यावरण दिन व आपण ” या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परिसरात,अंगणात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करा असे आवाहन त्यांनी केले.मानवाच्या विकासासाठी लाखो वृक्षांची कत्तल होत आहे. उदाहरणादाखल त्यांनी नागपूर मुंबई समृद्धी मार्गासाठी सुमारे तीन लाख वृक्षांची कत्तल झाल्याचे सांगितले. एकीकडे वृक्ष संहार होत असताना दुसरीकडे त्याप्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.शासनाने सामाजिक वनीकरण मोहीम हाती घेतल्याने तसेच विविध सामाजिक संघटना वृक्षारोपण तसेच प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न करत आहेत ही समाधानाची बाब आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी हरिभाऊ सूर्यवंशी तसेच अरुण गोजरे गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी एकनाथ चव्हाण,अशोक मूत्रक,शिवाजी वाजे,शिवाजी देशमुख,रघुनाथ गुजर,तारामती कटारिया,शालिनी देशमुख,भानुदास माळी,हिरालाल कोकाटे आदि उपस्थित होते.
