
.सिन्नर (.प्रतिनिधी ) शिवाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था सिन्नरचे अध्यक्ष तसेच भीमसंदेश बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव रावसाहेब आढाव यांचा जन्मदिन (५ जून) उत्साहात संपन्न झाला. त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिन्नरच्या वतीने अभिष्टचिंतन करताना नाशिक जिल्हा अंनिसचे उपाध्यक्ष डॉ. श्यामसुंदर झळके यांनी सांगितले की,रावसाहेब आढाव हे केवळ बांधकाम व्यावसायिक नसून सामाजिक सेवेचा अखंड वसा चालवणारे जनसेवक आहेत. शिक्षण,सहकार व सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. गोरगरीब,वंचित घटकांसाठी ते नेहमीच मदत करत असतात. त्याचा जन्मदिन ५ जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन असल्यामुळे या क्षेत्रात ही त्यांचे मोलाचे योगदान असल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून जन्मदिना सोबतच जागतिक पर्यावरणदिन ही साजरा केला जातो. या दिनाचे महत्व अधोरेखित करताना डॉ.झळके यांनी पर्यावरण संतुलन, वृक्ष वृक्षारोपण ,त्याचे संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी व नैतिक कर्तव्य आहे असे सांगून प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावून पर्यावरण संतुलन राखण्याचे आवाहन केले. अंनिस चे पदाधिकारी दीपक भालेराव यांनी आढाव यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आढाव यांना वृक्ष रोपटे तसेच अंनिसची दिनदर्शिका देऊन स्वागत केले.यावेळी पदाधिकारी बापू चतुर,प्रमोद काकडे ,बस्तीराम कुंदे आदी उपस्थित होते.

डॉ.शामसुंदर झळके: रावसाहेब आढाव यांचे अभिष्टचिंतन करताना अनिसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके
