
पत्ता लिहिताना आपण पिनकोड लिहितो तो ६ नंबरचा आकडा असतो, भारतातील कुठल्याही क्षेत्राला डाक विभागाद्वारे दिलेली ती ओळख असते. तरीसुद्धा एखादे कुरिअर अचूक पत्त्यावर पोहचत नाही, त्यासाठी भारतीय डाक विभागाने आता पत्ता शोधणारी नवीन प्रणाली निर्माण केली आहे. त्याला डिजिपिन (Digipin) नाव देण्यात आले आहे. यामुळे देशातील कुठलाही भाग किंवा कोपऱ्याचा पत्ता डिजिटल पणे मिळू शकतो. डाक विभागाने IIT हैदराबाद आणि ISRO सोबत मिळून ही प्रणाली विकसित केली आहे. या सिस्टम अंतर्गत देशाला ४ मीटर बाय ४ मीटर आकाराच्या छोट्या छोट्या भागात विभाजन केले आहे. प्रत्येक भागाला एक यूनिक आयडी देण्यात आला आहे. हा आयडी १० आकडी अक्षरांचा एक कोड असेल, त्याला डिजिपिन म्हटलं जातं. हा कोड कुठल्याही जागेचा Latitude आणि Longitude वर आधारित असेल. यामुळे एखाद्या गल्लीबोळातील कुठलेही ठिकाणी सहज अचूक मिळू शकते. आता कुठल्याही कुरिअरवाल्याला किंवा व्यक्तीला एखादे पार्सल तुमच्या पर्यंत पोहचवण्यात अडथळा किंवा समस्या येणार नाही. खूप मोठा परिसर दर्शवणाऱ्या ६ अंकी पिनकोड ऐवजी अचूक स्थान दर्शवणाऱ्या १० आकड्यांचा किंवा अक्षरांचा डिजिपीन कोड लवकरच वापरात येईल.तुम्हाला तुमचा डिजिपिन हवा असेल, तर Digipin च्या अधिकृत वेबसाइटवर गेल्यानंतर, तुम्ही तुमचा पूर्ण पत्ता किंवा जीपीएस लोकेशन तिथे नोंदवू शकता. त्यानंतर सिस्टम तुम्हाला तुमच्या लोकेशन नुसार १० अक्षरी युनिक कोड देईल. हा तुमच्या पत्त्याचा डिजिपिन असेल. हा कोड अचूक लोकेशन दर्शवितो. भविष्यात पोस्टल सेवा, ऑनलाइन डिलिव्हरी आणि सरकारी यंत्रणा देखील या डिजिपिनचा वापर करतील.
