
नांदगाव (प्रतिनिधी)पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 वी जयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदगाव शाखेतर्फे दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ वैजनाथ जिजाजी (तांत्रिक) विद्यालय [व्ही.जे.हायस्कूल], नांदगाव येथे पार पडला. अभाविप तर्फे या सत्कार समारंभात नांदगाव शहरातील दहावी व बारावी मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. नांदगाव शहर मंत्री आदित्य हिवळे यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक मांडली व प्रमुख अतिथी डॉ. हर्षद सुनील तुसे यांनी विद्यार्थ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद महाराज, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर अशा थोर व्यक्तिमत्त्वांचे विचार मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांना देशाप्रतीचे आजच्या तरुणांचे कर्तव्य तसेच विद्यार्थ्यांचे समाजाप्रती काय योगदान असले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले तसेच शिक्षणाचा फायदा हा वैयक्तिक जीवना पुरता मर्यादित न ठेवता शिक्षणाच्या फायदा समाजाला, राष्ट्राला तसेच ग्रामीण भागातील गरजूवंतांना झाला पाहिजे याबाबत विशेष मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून या कार्यक्रमाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री मेघा शिरगावे या उपस्थित होत्या. त्यांनी अभाविपची मांडणी करताना अभाविपचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांसाठी अभाविपचे विविध कार्यक्रम, उपक्रम तसेच अभियान या याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमात नांदगाव शहरातील 80 हून अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.**डॉ. हर्षद सुनील तुसे यांनी मातोश्री वत्सलाबाई वाल्मीकराव तुसे बहुउद्देशीय संस्थेतर्फे विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
