शब्दांकन :श्री. राम ढोलीपर्यवेक्षक लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर.

‘ बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन, कर्मवीरांच्या त्याग आणि समर्पणातून दुसऱ्या शतकात पदार्पण केलेल्या , कार्यकारी मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी आणि सन्माननीय संचालकांच्या अविरत प्रयत्नातून देशभरात लौकिकास पात्र ठरलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सायखेडा (ता. निफाड, जि. नाशिक) शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री. N.K तथा नवनाथ केरूजी निकम सर आपल्या 32 वर्षांच्या शैक्षणिक सेवेच्या प्रवासानंतर 31 मे २०२५ अखेर सेवानिवृत्त होत आहेत. सुप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ ब्रॅड हेनरी शिक्षकाच्या बाबतीत फार सुंदर विचार सांगतो. तो म्हणतो, “एक चांगला शिक्षक आशा जागवतो, कल्पनाशक्तीला पेटवतो आणि शिक्षणाची आवड निर्माण करतो.” हेनरीचे म्हणणे निकम सरांनी आपल्या समर्पित शैक्षणिक सेवेच्या माध्यमातून खरे करून दाखवले. सरांचा जीवनप्रवास म्हणजे एका कल्पक समर्पित शिक्षकाचा, कुशल प्रशासकाचा, संवेदनशील मार्गदर्शकाचा आणि आदर्श कार्यकर्त्याचा , दिलदार मित्राचा प्रेरणादायी प्रवास आहे. निकम सरांनी B.Sc., B.Ed. (Physical), आणि LLB ही शैक्षणिक पात्रता मिळवून 1993 साली मराठा विद्या प्रसारक समाजाचे तत्कालीन सरचिटणीस डॉ. वसंतराव पवार यांच्या नोकरी रूजू आदेशाने जनता विद्यालय, चाटोरी येथे उपशिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. त्यांनी 27 वर्षे उपशिक्षक, 2 वर्षे पर्यवेक्षक, आणि 3 वर्षे मुख्याध्यापक म्हणून कार्य केले. या कालखंडात त्यांनी चाटोरी, धोंडेगाव, घोटी, गांधीनगर ,मराठा हायस्कूल अशा विविध शाळांमध्ये आपला ठसा उमटवला. “शिक्षक हे एकमेव व्यावसायिक आहेत जे इतर सर्व व्यावसायिक घडवतात.” या सुभाषितातील विचाराने आयुष्यभरात हजारोंना उभे करण्याचे काम सरांनी अतिशय निष्ठेने त्यागाने आणि सेवाव्रती भावनेने केले आहे .सेवेच्या सुरुवातीच्या काळातच जनता विद्यालय, चाटोरी शाळेत कार्यरत असताना कर्मवीर कै. विठ्ठलराव हांडे साहेब ,तत्कालीन शालेय समिती अध्यक्ष कै. रामकृष्ण माधवराव हांडगे, संतू पाटील हिरे, भाऊसाहेब घोलप ,सेवा सोसायटीचे चेअरमन सदुभाऊ खेलुकर, माजी सरपंच व तंटामुक्तीचे अध्यक्ष रघुनाथ हिरे ,दिलीप अण्णा कदम ,अशोकराव काकडे ,कै .रामकृष्ण घोलप कै. गोपाळराव हिरे गुरुजी, कै. किसनराव गंगाराम घोलप कै.बाबुराव तुकाराम ढोमसे ,कै .दत्तू मामा खेलूकर, संपतराव हांडगे ,कोंडाजी वरखेडे, नारायण मामा वरखेडे, कचरू नाना हांडगे सर, कै. रुंजाजी माधवराव हांडगे सर व समस्त ग्रामस्थांच्या मदतीने गावच्या मांगिरबाबा देवस्थान ट्रस्टची जंगलव्याप्त अडीच एकर जमीन संस्थेचे तत्कालीन सरचिटणीस कर्मवीर कै. डॉ. वसंतराव पवार ,सभापती माणिक तात्या बोरस्ते, तत्कालीन शिक्षणाधिकारी कै. पी.के ठोंबरे सर ,श्री. आर एस .आहेर सर यांच्याकडे जमीन हस्तांतरणाचा ठराव करून वर्ग केली .त्या जागेवर आज भव्यदिव्य शालेय इमारत कंपाउंड भिंतींसह उभी आहे.इमारत बाधकाम निधी उभारण्यात व क्रीडांगण तयार करणे कामी सर्व चाटोरी ग्रामसथांनी सरांच्या मार्गदर्शनातून संस्थेला खूपच आर्थिक मदत झाली.यामुळे सर्व चाटोरी ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांमध्ये सरांप्रती आजही मोठा आदरभाव आहे.सरांच्या या कार्यकुशलतेचे वर्णन मला पुढील चार ओळींतून करावेसे वाटते. चाटोरी गावाच्या मातीत विश्वासाचं बीज पेरलं, संस्थेच्या छायेखाली शिक्षणाचं झाड रुजलं, प्रयत्नंची झालर नि समर्पणाची मूळं, आजही घडतात इथं विद्येची निर्मळ फुलं || इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित जादा तासिकांद्वारे मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग, सायखेडा व परिसरातील इतर शाळांतील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करून त्यांनी गणित विषयात भक्कम पाया घातला. पंचायत समिती निफाडच्या शाळा तपासणी पथकात गणित व क्रीडा विषयाचे तज्ज्ञ म्हणून सहभाग घेतला. जिल्हा आणि राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन, कवी संमेलन, आणि विज्ञान प्रदर्शने यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता विकसित केली. एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेसाठी ‘भूमिती’ व ‘विज्ञान’ २ या विषयांचे परीक्षक म्हणून कार्य करत, जिल्ह्यातील कमी निकाल असलेल्या शाळांतील गणित शिक्षकांना प्रशिक्षण देताना ते रिसोर्स पर्सन म्हणून कार्यरत राहिले. व्हॉलीबॉल व खो-खो या खेळांचे अभ्यासक असलेल्या सरांनी विद्यार्थ्यांना कबड्डी, बॅडमिंटन, बाॅलबॅमिंटन,टेनिकवाईट, फेंसिंग, फुटबॉल, बुद्धिबळ अशा विविध खेळांचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळणारे विद्यार्थी घडले. फेंसिंगमध्ये पाच विद्यार्थ्यांनी राज्य शासनाचा‘ शिवछत्रपती पुरस्कार’ प्राप्त झाला. यासाठी फेंसिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अशोक दुधारे आणि सचिव श्री. राजू शिंदे यांचे सहकार्य लाभले. प्रथितयश संगीतकार प्रसाद पुराणिक यांच्या सहकार्याने ‘ढोल वादन पथक’ तयार करून, ४० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. मविप्र राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये या पथकाच्या वादनाचा सहभाग शाळेच्या सन्मानाची बातमी ठरली. शाळेतील एन.सी.सी व एम.सी.सी. विभागामार्फत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवले, संचलनाचे प्रशिक्षण दिले, देश सेवेसाठी तयार केले. कितीतरी विद्यार्थी देशासाठी समर्पित जीवन जगले त्याचे बाळकडू विद्यालयाच्या एन.सी.सी व एम.सी.सी.च्या माध्यमातून सरांना देता आले. विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा उठावदार सहभाग मिळवून दिला. गोदावरी नदीच्या प्रदूषणाविरोधात गोदावरी आरतीचे आयोजन हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत करून समाजप्रबोधनाचे उदाहरण उभे केले.“The influence of a great teacher can never be erased.””एका उत्तम शिक्षकाचा प्रभाव कधीही पुसला जाऊ शकत नाही.” या प्रभावाचा परिणाम स्वरूप सरांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राज्याचे तत्कालीन ऊर्जा राज्यमंत्री नामदार तुकारामजी दिघोळे यांचे शुभ हस्ते चाटोरी ग्रामपंचायत कडून ‘आदर्श शिक्षक ’पुरस्कार, श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक केंद्र दिंडोरीचे प्रमुख परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांचे शुभहस्ते साप्ताहिक गोदाकाठचा ‘गोदाभूषण’ पुरस्कार, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचा ‘आदर्श क्रीडा शिक्षक’ पुरस्कार, जिल्हा क्रीडा कार्यालयाचा ‘आदर्श क्रीडा कार्यकर्ता’ पुरस्कार, माध्यमिक शिक्षक संघ व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा ‘उपक्रमशील शिक्षक’ पुरस्कार,१००८ परमपूज्य धर्माचार्य भगवान महाराज शिवगोरक्ष योगपीठ नाशिक यांचा ‘उत्कृष्ट योगशिक्षक’ पुरस्कार , जिल्हा क्रीडा कार्यालयाचा उपक्रमशील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार. ……. आणखी कितीतरी ! हे पुरस्कार सरांच्या सेवाव्रताची जणू साक्षच देतात. शेतकरी, कष्टकरी, वंचित घटक ,अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी , प्रतिभाशाली विद्यार्थी, पालक नेहमीच सरांच्या रडारवर असत. त्यांचे प्रश्न, अडचणी ,समस्या जाणून घेत घेत या सगळ्यांच्या मनात एक आदराचे स्थान सरांनी कधी निर्माण केले हे त्यांनाही कधी कळले नाही. शालेय समिती ,शिक्षक पालक संघ ,माता पालक संघ, माजी विद्यार्थी संघ, शाळा व्यवस्थापन समिती, संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या सहकार्यामुळे सरांची शैक्षणिक वाटचाल सुकर झाली , सरही या सर्वांच्या आदरास पात्र ठरले. वारकरी संप्रदायाशीही सरांची नाळ जोडलेली आहे. ते स्वतः भागवत भक्त आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी प्रासंगिक स्वरूपात का होईना पण व्याख्यान करण्याची संधी त्यांनी सोडलेली नाही. एक व्यासंगी आणि अभ्यासू व्याख्याते व विविध शैक्षणिक,सामाजिक, राजकीय,लग्नसमारंभाचे सुञसंचालक म्हणून त्यांची ख्याती आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, शिवाजीराव निरगुडे, रवींद्र मोरे,अरूण पिंगळे,चंद्रकांत कुशारे यांच्या मार्गदर्शनामुळे निकम सरांनी टि.डी.एफ व माध्यमिक शिक्षक संघात सक्रिय सहभाग घेतला. प्रकाश सोनवणे व साहेबराव कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्य केले. संजय चव्हाण यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र छात्र सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही योगदान दिले. जिल्हा मुख्याध्यापक संघात एस.बी. देशमुख, गोरख कुणगर, शिवाजी शिरसाट, प्रदीप सांगळे यांच्यासोबत कार्य केले. अगदी लहान वयातच सरांचे मातृछत्र हरपले. मातोश्री हिराबाईंचे निधन झाल्यानंतर सरांचे प्राथमिक शिक्षण मामांकडे – भुसे (ता. निफाड) येथे झाले. आजी कै. गं.भा.गंगुबाई भागुजी पा.भुसारे,मोठया मामी कै.गं.भा.जिजाबाई वेडूजी पा.भुसारे–मामा संस्थेचे जेष्ठ सभासद कै.वेडुजी भागुजी पा. भुसारे आणि लहान मामी सौ.मथूराबाई मोतीराम पा.भुसारे,मामा श्री.मोतीराम भागुजी पा. भुसारे यांचे– मार्गदर्शन त्यांच्यासाठी मोलाचे ठरले.मामा मामींनी सरांची आई आणि वडिलांची भूमिका निभावली आणि सरांच्या आयुष्यात प्रचंड सकारात्मक बदल घडले.पाचवी ते दहावीचे शिक्षण आरूढ विद्यालय म्हाळसाकोरे येथे झाले. बी.एससी व बी.एड (फिजिकल )चे शिक्षणही मामांच्याच मार्गदर्शनाखाली KTHM college Nasik येथून पूर्ण केले. तसेच एल.एल.बी.चे शिक्षण एन.बी.टी.लाॅ काॅलेज नाशिक येथून पूर्ण केले. निकम सरांचे मुळ गाव नांदगाव ता.निफाड हल्ली मुक्काम जञा हाॅटेल समोर महालक्ष्मीनगर आडगाव शिवार नाशिक. वडील श्री. केरू रामजी निकम आणि आई कै. हिराबाई यांच्या चार अपत्यांपैकी सर दुसरे. त्यांच्या पत्नी मंजुषा निकम या उत्तम गृहिणी आहेत. त्यांना दोन मुले – सौरभ (MBBS . पुणे येथे डॉक्टर आहे.) आणि यश (B.E इलेक्ट्रिकल इंजिनिअर व राष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू) – ही त्यांची प्रेरणा आहेत. “A teacher affects eternity; he can never tell where his influence stops.” – Henry Adams”एक शिक्षक अनंत काळासाठी प्रभाव टाकतो; त्याच्या प्रभावाची सीमा त्यालाही सांगता येत नाही.” निकम सरांसाठी हे विधान तंतोतंत लागू पडते. निकम सर हे एक आदर्श शिक्षक, उत्तम प्रशासक, कुशल क्रीडामार्गदर्शक, समर्पित समाजसेवक आणि संवेदनशील माणूस म्हणून ओळखले जातात. त्यांच्या व्यक्तिमत्वात ज्ञान, शिस्त, विद्यार्थी ,पालक ,अभ्यंगत व सहकारी शिक्षकांप्रती सहवेदना कायमच जाणवत असते.कार्यकुशलता आणि दिलदारी यांचा सुंदर संगम म्हणजे एन. के. निकम सर. मविप्र संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली, संस्थेच्या विश्वासास पात्र ठरून सर मे २०२५ अखेर सेवानिवृत्त होत असले तरी त्यांच्या कार्याचा ठसा, आठवणी, संस्कार आणि योगदान यांचे प्रभावी अस्तित्व शाळेतील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, गाव व परिसरातील संस्थेचे हितचिंतक ,आश्रयदाते, देणगीदार, संस्थेतील शिक्षक यांच्या मनात सदैव राहील.“शिक्षक ही केवळ नोकरी नाही, ती एक दीर्घकालीन सेवा आहे – भविष्य घडवण्याची.” आपल्या बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवा काळात सतत प्रवाहित ज्ञान, समर्पण आणि माणुसकीचा आदर्श दाखवणाऱ्या , अनेकांचे आयुष्य घडविणाऱ्या श्री. नवनाथ केरुजी निकम सर, श्री .आर .पी .कदम सर यांची सेवानिवृत्ती शनिवार दिनांक 31/05/2025 रोजी संपन्न होत आहे.सेवानिवृत्ती निमित्ताने दोघानाही मनःपूर्वक लाख लाख हार्दिक शुभेच्छा.
