
.श्यामसुंदर झळके सिन्नर (प्रतिनिधी) — प्रत्येकाला कोणता कोणता छंद असतो व तो जोपासण्यासाठी तो खूप मेहनत घेऊन यशस्वी होतो व त्याला प्रसिद्धीही मिळते. असाच एक छंडवेदा माणूस नाशिकचे रविंद्र बन्सीलाल राठी यांनी बालपणापासून ऐतिहासिक दुर्मिळ नानी व नोटा जमा करण्याचा छंद लागला व तो त्यांनी मोठ्या कष्टाने पूर्णत्वास नेला.केवळ देशातीलच नव्हेतर तब्बल ३३६ देशातील दुर्मिळ नाणी व नोटा यांचा संग्रह केला व तो जनतेपर्यंत पोहचावा यासाठी परिश्रम करून त्याचे प्रदर्शन भरवावे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली.

पहिलेच प्रदर्शन त्यांनी कोपरगाव येथे १९८७ मध्ये भरवून इतिहासप्रेमी विद्यार्थी व अभ्यासकांना उत्तम संधी प्राप्त करून दिली.त्यानंतर महाराष्ट्रात व इतरत्र त्यांनी अनेक ठिकाणी प्रदर्शने आयोजित केली. १९७१ पासून त्यांनी हा जगावेगळा अनोखा छंद जोपासला व त्यासाठी जीवाचे रान केले.अनेक संशोधक, इतिहास अभ्यासक, भारतातील ऐतिहासिक वस्तू संग्रालये यांना भेटी दिल्या.परदेशात जाणाऱ्या व तेथे वास्तव्य करणाऱ्या नातेवाईक मित्रपरिवार यांच्याकडून परदेशी चलन मिळविले. भारताचा समृध्द ऐतिहासिक वारसा,संस्कृतीची ओळख व्हावी,तिचे जतन व्हावे,नवीन पिढीला त्यापासून काहीतरी शिकता यावे यासाठी रविंद्र राठी व त्यांचे कुटुंब त्यांच्या अर्धांगिनी संगीता,मुलगा धीरज, स्नुषा आरती, मुली राखी पूनम या सर्वांचे हा छंद जोपासण्यात महत्वपूर्ण योगदान आहे.तसेच त्यांना पोस्टाची तिकिटांचाही संग्रह करण्याचा छंद आहे. भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय नाणे प्रदर्शनात आपल्याला यादवकालीन,मोगल कालीन,शिवकालीन नाण्याबरोबरच ईस्ट इंडिया कंपनी,निजाम,इंदूरचे होळकर,बडोद्याचे गायकवाड, ग्वाल्हेरचे शिंदे,उदयपूर, त्रावणकोर येथील संस्थानिकांनी तयार केलेली प्राचीन नानी,सोन्याच्या नोटा,कागदी चलनी नोटा आदींचा दुर्मिळ संग्रह बघावयास मिळतो.

इंग्लंड ने प्रिन्स चार्ल्स व डायना यांच्या विवाहानिमित्त काढलेले खास नाने,लोकांना अनभिज्ञ असणाऱ्या बार्बाडोस, स्टेट ऑफ जरसी, नेगरा, पेरुग्वे, पापुआ,न्यू गिनी,सायोवा आदी असंख्य देशांची नानी बघण्याची संधी प्रदर्शनात मिळते. सिन्नरला ३० व ३१ जानेवारीला हे प्रदर्शन उगले लॉन्स येथे आयोजित केले.सिन्नर मधील अनेक शाळा,महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन राठी कुटुंबीयांचे अभिनंदन केले.
