
नाशिक:-(प्रतिनिधी )संवेदनशील जाणिवा असणारी माणसंच समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतात. अशा माणसांचं संपूर्ण वागणं हे समाजाला हितकारक असतं. या माणसांसह आदिवासी भागातील प्रत्येकाच्या जीवनाचा संघर्ष हाच पाया असतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध आदिवासी साहित्यिक तुकाराम चौधरी यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ‘पाड्यावरचा टिल्ल्या’ या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा.विनोद पवार होते. श्री.चौधरी पुढे म्हणाले की, चांगल्या शिक्षणाच्या जोरावर गावचा विकास होऊ शकतो. आदिवासी पाड्यावर ‘पाड्यावरच्या टिल्ल्या’सारखे अनेक असतात; की जे उत्तम कार्य करू शकतात. विकृत माणसांना सुधारायची ताकद त्यांच्यात असते. अशाच एका नायकाची कहाणी म्हणजे हे पुस्तक होय. या कादंबरीत आदिवासी भागातील आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्नही मांडले असल्याचे ते म्हणाले. चंदर बोरसे आणि प्रेरणा वानखेडे यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. सुनंदा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र देसले यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (दि.२७) किरण मेतकर ‘जेव्हा जग थांबलं होतं…’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
