लेखक:-रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर
मे महिन्यातील दुसरा रविवार ‘जागतिक मातृदिन’ म्हणून साजरा केला जातो. मातेचं वात्सल्य प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अनन्यसाधारण असतं. त्यानिमित्ताने…

_‘दारिद्र्याच्या संसाराचे नंदनवनही करते आई_**_चिलापिलांना प्रकाश देण्या दिव्यासारखी जळते आई…’_* गझलकार मित्रवर्य गौरवकुमार आठवले यांच्या गझलेतील या ओळी ऐकल्या की माझ्या प्राणप्रिय आईचा चेहरा डोळ्यासमोर उभा ठाकतो. माझी आई कर्तृत्ववान, स्वाभिमान, संस्कार, खंबीरपणा, नीतिमत्ता तिच्याठायी पुरेपूर भरलेली. तशी ती खूप खंबीर वरवर तर काटेरी फणसासारखी दिसणारी. प्रथमदर्शनी स्पष्टवक्ती नि रागीट. परंतु फणसाच्या आतील गोड-रसाळ गराने जसा आस्वादक तृप्त होतो. त्याप्रमाणे संपर्कात येणाऱ्याला आचार-विचारांचा मधाळ गोडवा देणारी कोमल हृदयाची माझी आई. तिला आम्ही ताई म्हणत.अठराविसे दारिद्र्यातील अतिशयगरिबीचा संसार सांभाळताना ‘कणखर’पणाचं मूर्तिमंत प्रतीक असणारी माझी आई नावाप्रमाणेच ‘सुमन’ होती. काटेरी नि कष्टप्रद आयुष्य जगूनही परिवाराला फुलाप्रमाणे जपत जपत स्वत: मात्र झिजत गेली. तशी माहेरची परिस्थिती उत्तम असूनही त्यांच्या एकाही पैशाचा आधार न घेता आयुष्यातली सारी सुखं आम्हाला दिली. लग्न झाल्यानंतर रुपया रोजाने शेतात राबणारी, डॉक्टरकडे आया म्हणून काम करणारी, जुन्या डंगरी शाळेत केवळ दुसरी शिकलेली असूनही जिद्दीने शिवणक्लास पूर्ण करणारी, माझ्यातल्या कवीला फुलवणारी, वडिलांच्या तापट परंतु माणुसकीच्या नात्याला जीवापाड जपणारी, घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे आदरातिथ्य करणारी, वडिलांच्या दीर्घ आजारपणात खचून न जाता खंबीरपणे सेवा करणारी, माझ्या वडिलांचा मृत्यू डोळ्यासमोर दिसत असतानाही दु:ख पचवून आला दिवस मागे टाकणारी, वडिलांनंतर पै-पै साचवून आमचा आईबरोबरच वडील म्हणूनही सांभाळ करणारी, स्वत:चं बळावलेलं आजारपण आणि स्वत:च्या मृत्यूनंतरच्याही सर्व खर्चाची तरतूद करून ठेवणारी माझी आई. आज हे सारंआठवताना मन व्याकूळ होतं. जीवन कसं जगावं…याचा आदर्श आणि संस्कारांचा महान ठेवा देऊन गेलेली माझी एकमेवाद्वितीय आई.माता-पिता हेच आपले पहिले गुरू. या गुरूंचे संस्कार घेऊनच उच्चविद्याविभूषित होऊन अध्यापनाच्या क्षेत्रात सुसंस्कारांची शिदोरी वाटण्याचं पवित्र कार्य मला करता येते आहे, यापेक्षा दुसरे भाग्य कोणते? तिच्याप्रमाणेच परिवाराच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. नात्यांच्या बंधनाचे, दु:खाचे अनेक कटूप्रसंग ओढवले पण त्यातून खंबरपणे बाहेर पडून जगण्याच्या, अस्तित्वाच्या लढाईत यशस्वीपणे ठाम उभे राहण्याचे तिचे अमूल्य संस्कार आम्हाला जिद्दीने ध्येयवादी वाटचाल करायला शिकवतात.माझ्यातल्या रवीचा ‘कवी रवी’ घडविण्यात, आल्या-गेल्या पाहुण्यांना, रात्री-बेरात्री घरी आलेल्या आगंतुकाला उन-उन पिठलं भाकरी करून तृप्त करायची माझी आई. त्या पाहुण्याचा समाधानाचा ढेकर तिला उमेदीनं काम करण्याचं बळ द्यायचा. हे करताना तिने कधीही आढेवेढे घेतले नाही. माझ्या परिवाराला आजतागायत ही सवय लागली आहे, ती केवळ तिच्यामुळेच मातापित्यांच्या संस्कारांचे, नैतिकतेचे धडे गिरवत गिरवत आम्ही लहानचे मोठे झालो. गरिबीचे चटके त्यांनी स्वत: सोसले; पण त्याचा दाह आम्हाला जाणवू दिला नाही.आम्हां भावंडांना आवश्यक त्या सर्व गोष्टी मिळत मात्र थोड्याशा उशिराने. माझे वडील शाळेत शिपाई. त्यांच्या खाकी गणवेशाची जी जुनी पॅन्ट असायची; त्याची हाफपॅन्ट मला शिवायची. कपडा जुना झालेला असल्याने पॅन्टलवकर फाटायची. तेथे ताई ठिगळ लावायची. खाकी रंगाचा दोरा नसल्याने पांढऱ्या रंगाच्या दोऱ्याने रफू केल्याने शर्ट इन केल्यावर ते दिसायचे. मुलं चिडवत, ‘तुला पाठीमागून दोन डोळे आलेत हॅ ऽऽ हॅ ऽऽ…’ मी रडत रडत घरी येई. रडण्याचे कारण विचारताच आईला मुलं चिडवत असल्याचे सांगितले. ती म्हणाली, ‘अरे कुणाची गरिबी आयुष्यभर राहत नाही. आपलेही दिवस निघून जातील. आपण चांगलं शिकून, कष्ट करून नक्कीच पैसे मिळवू. मग नवीन ड्रेस घेऊ. काही काळजी करू नकोस.’ तिच्या समजावण्यामुळे नंतर कधीही डगमगलो नाही.तिच्या आणि दादांच्या मेहनतीला फळ मिळालं. शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागलो. दोनाचे चार हात झाले. संसार बहरला. चिमणी पाखरं चिव-चिव करू लागली. साहित्य-समाज सेवेतील पुरस्कारांची अनेक सन्मानचिन्हे घरात गर्दी करू लागली. मात्र यामागे राबणारे आणि यशाचे खरे शिल्पकार असणारे प्राणप्रिय मातपिता हे सुख उपभोगायला राहिले नाहीत, ही दु:खरी खंत मनात आहेच.मनाची श्रीमंती आणि आमच्यासाठी सुखसमृद्धीची फळं देऊन ते निघून गेले. राबराब राबून पै-पै जमा करून त्यांनी आम्हाला भाडेतत्त्वावरील पत्र्याच्या घरातून प्रशस्त हवेशीर तीन खोल्यांची सदनिका घेऊन दिली. आयुष्यभराची पुंजी जमा करून स्वत:च्या कर्जबाजारीपणाचा भार आमच्यावर पडू दिला नाही. स्वत:च्या मृत्यूनंतरच्या संपूर्ण विधीच्या खर्चाची तरतूदही तिने स्वत:च करून ठेवल्यामुळे माझं मुलाचं कर्तव्य पार पाडण्याची संधीही दिली नाही.कमालीचा स्वावलंबीपणा, गरजेसाठी दुसऱ्यापुढे कधीही हात न पसरवण्याची त्यांची वृत्ती, आलेल्यांना चटणीभाकरी खाऊ घालण्याचं दातृत्व आणि माझ्यासह अनेकांना दीपस्तंभरूपी प्रकाशमान दिशा दाखवणारी, आमच्यात माणुसकीरुजवणारी ‘सुमन’ नावाची माझी ‘कणखर’ आई आणि वडील यांच्याबद्दल सांगताना मला आठवतात लोकगीतातील या समर्पक ओळी…*_बाप्पाजी माझा वड, माय माझी फुलजाई_**_दोघांच्या सावलीची, काय सांगावी बडेजाई_**-रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर.*
