
–काव्य संग्रह – *मला कवीचा चष्मा लागला*
कवी – *अरुण वि. देशपांडे*(मो.नं. – 9850177342)
प्रथम आवृत्ती – फेब्रुवारी २०२५प्रकाशन – संवेदनापृष्ठ संख्या – ९६किंमत – ₹ १५०/-गेली जवळपास ४० वर्षे एवढा प्रतीर्घ काळ साहित्यात भ्रमंती केल्यावर ज्येष्ठ कवी श्री.अरुण देशपांडे यांना कवीचा चाळीशीचा चष्मा लागला आहे असं म्हणता येईल.म्हणजेच प्रगल्भ अनुभवविश्व घेऊन त्यांची कविता साहित्यात वावरताना दिसते. आणि म्हणूनच कदाचित ‘मला कवीचा चष्मा लागला’ या नावाचा नवीन कवितासंग्रह घेऊन अरुण देशपांडे रसिकांसमोर ठेवत आहेत.’मला कवीचा चष्मा लागला’ हे अरुण देशपांडे यांचं ७८ वे पुस्तक आहे आणि हा त्यांचा ३२ वा कवितासंग्रह आहे. कवी, लेखक, बालसाहित्यिक, समीक्षक अशा विविध भुमिकेतून अरुण देशपांडे निगुतीने साहित्य सेवा करीत आहेत…प्रस्तुत संग्रहातील रचनाही त्यांच्या शैली प्रमाणे साध्या, सरळ आणि सुबोध आहेत. अवघड, अनवट शब्दांची झुल न पांघरता, आडवळणाने न बोलता, जे काही सांगायचं आहे ते सरळ, थेट, सोप्या भाषेत मांडण्याची हातोटी या साऱ्या रचनांमध्ये दिसून येते. वृत्त आणि अलंकार यांच्या जाळ्यात बंदिस्त न राहता थोडीशी मुक्तशैली हाताळताना हा कवी दिसतो. ठराविक साचा किंवा आकृतीबंधात स्वत:ला अडकवून न ठेवता, अक्षरच्छंद, अभंग, ओवी, मुक्तछंद… अशा विविध प्रकारांमध्ये हा कवी लेखन करताना दिसतो. काव्य प्रकारांच्या वैविध्यतेप्रमाणेच विषयांचं वैविध्यही या संग्रहातील रचनांमध्ये आपल्याला दिसून येतं. गाव, निसर्ग, आठवणी, अनुभव, आई, नातेसंबंध, मन, कवी, कविता, समाज, मैत्री, स्वप्न, आशावाद, पाऊस, प्रीत… असे विविध विषय या साऱ्या कवितांमधून अरुण देशपांडे यांनी हाताळलेले दिसून येतात…’गावाकडचे मन माझे धाव घेतेस्वप्नी मज माझे गाव दिसते’अशा काव्यपंक्ती मधून कवीला आपले गावाकडचं आठवणीतले दिवस आजही साद घालताना दिसतात…’अस्वस्थ मनास स्थिरतादेऊ शकते ती कविता,भावनांचे प्रतिबिंब असतेसहज सुंदर ती कविता’जेवढं मन अस्वस्थ तेवढ्या त्यातून येणाऱ्या संवेदना या तीव्र असतात. आणि मनाच्या अस्वस्थतेतून एखादी कविता बाहेर आली की पाऊस पडून गेलेल्या शांत निरभ्र आकाशासारखं मन शांत स्थीर होतं. मनाच्या या भावभावनांचे चित्रण, टिपण हा कवी चपखलपणे मांडताना दिसतो…’मला कवीचा चष्मा लागालानवाच नंबर बदलून आला,दृष्टीदोषात सुधारणा झालीमाझ्या नजरेत फरक पडला…’एवढी वर्ष सातत्याने कवितेत, साहित्यात वावरल्यानंतर आपण आता कुठे आहोत, आपण किती प्रगल्भ झालो… याबद्दल तटस्थपणे कवीने आपले आपणच मुल्यमापन केले पाहिजे. आणि कवी अरुण देशपांडे याबद्दल सजगतेने विचार करताना दिसतात…’आयुष्य नावाच्या कोळ्यानेविणून ठेवलंय जगणे नावाचे,सुंदर मोहक फसवेसे जाळेघेते खेचूनी भक्ष्यास हे जाळे’आयुष्याकडे तटस्थतेने पाहताना, मोहक कोळ्याच्या जाळ्याची उपमा देत हा कवी आयुष्याचं सार मांडताना दिसतो…साठी ओलांडली मनानेशरीर सत्तरीचे थोडे थकले,उन्हाचे तडाखे सोसलेलेसांजसावलीत विरघळून गेले….’कवितेमध्ये कितीही स्वप्नरंजन केले गेले, तरी वास्तवाची जाण प्रत्येकाला असली पाहिजे. आणि वयाच्या पंच्याहत्तरीकडे झुकलेल्या नश्वर अशा देहाचे, वास्तवाचे भान ठेवून हा कवी येणाऱ्या संध्याकाळच्या सांजसावलीत विरघळून जाताना दिसतो…या संग्रहातील कविता आपण जेव्हा वाचतो तेव्हा त्या साऱ्या कविता आपल्याच आयुष्याविषयी असल्याची भावना वाचकांची होते, आणि हेच या संग्रहाचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं…अर्थ, आशय आणि प्रकार यांच्या विविधतेने सजलेला हा कवितासंग्रह आपण विकत घेऊन अवश्य वाचा. ज्येष्ठत्वाच्या चष्म्यातून कवी अरुणजी यांच्याकडून भविष्यातही आपल्याला अनेकविध कवितांची भेट मिळत राहो, अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि तुर्तास थांबतो…!!पुन्हा भेटू एका नवीन संग्रहासोबत… लवकरच…
◼️◼️◼️@ विजो (विजय जोशी)डोंबिवली९८९२७५२२४२
