
नाशिक (वार्ताहर) – दुसऱ्यांसाठी समर्पणभावनेने काम करणारे लोक अजूनही समाजात आहेत. म्हणून देशाचा कारभार सुरळीतपणे सुरू आहे. हेच लोक समाजातील सत् प्रवृत्ती टिकविण्याचे काम करतात. नाहीतर, आज घडीला समाजात सतत दुसऱ्यांचे ओरखडण्याची प्रवृत्ती वाढीला लागली आहे. प्रत्येकाला ईश्वराने एक प्रकारची शक्ती दिली असून तो त्याच्या क्षमतेनुसार त्या शक्तीचा वापर करत असतो. म्हणूनच समर्पण भावनेने कर्म केल्यावर योगसाधना प्राप्त होते व जगण्याचा खरा आनंद मिळतो. असे प्रतिपादन संविधानाचे अभ्यासक ‘पद्मश्री’ रमेश पतंगे यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयाच्या औरंगाबादकर सभागृहात ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेच्यावतीने कमल ताडगे यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय शिक्षकेतर कर्मचारी उत्कृष्ट सेवा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पतंगे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालय आणि नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके होते. समवेत नाशिक एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह राजेंद्र निकम, सामाजिक कार्यकर्ते अजित ताडगे, उद्योजक राजेश उपासनी, सेवानिवृत्त शिक्षिका कल्पना भामरे, ‘ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष राजाराम गायकवाड, उपाध्यक्ष वसंत पाटील, खजिनदार संगीता जाधव, विश्वस्त जयश्री उपासनी, संस्थेचे सल्लागार सुहास कुलकर्णी, जगदीप कव्हाळ, प्रा. अमोल अहिरे, विश्वस्त संदीप पवार, सावानाचे ग्रंथसचिव देवदत्त जोशी, समीर जोशी आदि मान्यवर उपस्थित होते. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या १३ लेखनिक, १० ग्रंथपाल, ४ प्रयोगशाळा सहाय्यक व १० शिपाई, सेवक अशा जिल्हाभरातील ३७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसंगी शरद केदारे व विलास सोनार यांनी पुरस्कारर्थीच्या वतीने मनोगतातून कृतज्ञताभाव व्यक्त केला. यावेळी कोठारी कन्या शाळेचे राजेंद्र मिश्रा यांनी संस्थेच्या सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदतीचा धनादेश दिला. प्रास्तविक राजाराम गायकवाड यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. अमोल अहिरे व प्राध्यापिका वसुधा जोशी यांनी केले. तर आभार प्रा. अहिरे यांनी मानलेत. समारोपानंतर उपस्थितांनी अल्पोपाहारांचा आस्वाद घेतला.
