
नाशिक ( प्रतिनिधी)- येथील ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून राज्यभरातील ३७ आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी यांना उत्कृष्ट सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर सोहळ्यास प्रमुख अतिथी व व्याख्याते म्हणून जेष्ठ पत्रकार पद्मश्री रमेशजी पतंगे उपस्थित राहणार असून, त्यांनी नाशिक येथील शिवनेरी या शासकीय विश्रामगृहात जाऊन निमंत्रण देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाराम गायकवाड, सल्लागार अजित कुलकर्णी, विवेकानंद केंद्राचे प्रा. अमोल अहिरे, संदिप पवार, राम अहिरे उपस्थित होते.

नाशिक सार्वजनिक वाचनालय, औरंगाबादकर सभागृहात शुक्रवार दि. २ मे २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आले असून, कार्यक्रमास माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील, नाशिक एज्युकेशन सोसायटी व सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, राजेंद्र निकम, स्वानंदी शिक्षण संस्थेच्या सचिव छाया कुलकर्णी, कल्पना भामरे आदी उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट सेवकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक दातृत्वाच्या निरपेक्ष भावनेतून संस्थेच्या वतीने गत सहा वर्षांपासून राज्यातील दिव्यांग व इतर क्षेत्रात कार्यरत आदर्श शिक्षकांना शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. तसेच महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जातो. पुरस्कारांपासून काहीसे उपेक्षित असलेल्या मात्र उत्कृष्ट सेवा देणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचारी वृदांचा सन्मान ज्ञानसाधना संस्थेच्या वतीने केला जाणार आहे. याकामी संस्थेच्या निवड समितीतर्फे विविध निकषाच्या आधारे पारदर्शकपणे निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

सदर सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
