
नाशिक:-(प्रतिनिधी ) महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वरांपासून ते गाडगेबाबांपर्यंत अनेक संत झालेत. याच परंपरेतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जनसेवेचा ध्यास घेत माणूस सुधारला तर गाव सुधारेल, गाव सुधारले तर पर्यायाने देशाचा विकास होईल, अशा प्रेरणेतून समाजप्रबोधन केले. म्हणूनच ग्रामसुधारणेसाठी आजच्या काळातही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार प्रेरणादायक आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मुकुंद बाविस्कर यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तु.सी.ढिकले होते. श्री.बाविस्कर पुढे म्हणाले की, आधुनिक विचारांचे राष्ट्रसंत असणाऱ्या तुकडोजी महाराजांना ‘राष्ट्रसंत’ ही पदवी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी दिली. ग्रामगीतासारखा अनमोल ग्रंथ लिहून त्यांनी ग्रामविकासाचा मार्ग दाखविला. भारत सरकारने त्यांचा केलेला गौरव, महाराष्ट्र शासनाने तुकडोजी महाराज यांच्या नावाने सुरू केलेले ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धा, नागपूरच्या विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे दिलेले नाव, महाराजांनी स्थापन केलेले गुरुदेव सेवा मंडळ आणि अमरावती नाजीक मोझरी येथे उभारलेला गुरुकुंज आश्रम अशा विविध घडामोडींचा सविस्तर आढावा या पुस्तकात घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी काश्मिरमधील दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. योगिनी खरे आणि माणिकराव गोडसे यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. मधुकर गिरी यांनी सूत्रसंचालन तर माणिकराव गोडसे यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (दि.२९) निशांत गुरू हे ‘वाघिणीचे दूध’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
