
नांदगाव,दि.26 (मुक्ताराम बागुल):- नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाटमाथावरील जातेगावची प्रथम महिला सैनिक वैशाली वाल्मीक पवार हिचा विवाह नांदगाव येथील रहिवाशी असलेला परंतु मुंबई येथे महानगरपालिकेत अग्निशमन दलामध्ये कार्यरत असलेल्या सागर राजेंद्र आहेर यांचे बरोबर दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी शुक्रवारी दुपारी मोठ्या थाटामाटात पार पडला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जातेगाव येथील वाल्मीक पवार यांची मुलगी वैशाली हिचे शिक्षण बीएपर्यंत झाले. तिचे वडील वाल्मीक पवार हे देखील सुशिक्षित असून त्यांना प्रयत्न करून नोकरी लागली नाही. चार एकर जिरायती शेत जमीन राहायला मातीचे जुने घर आर्थिक परिस्थिती बेताची आई परीगाबाई आरोग्य विभागात आशा वर्कर, घरात आणखी एक लहान बहीण अशा परिस्थितीमध्ये आई-वडिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून वैशालीने जातेगाव येथील जवळपास चारशे सैन्यतालातील आजी माजी सैनिकांची प्रेरणा घेऊन सैन्य दलात नोकरी करायचे ठरविले. त्यातच तिची जिद्द आणि चिकाटीला यश आले. सैन्य दलातील आय टी बि टी विभागात नोकरीसाठी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाली. तिने तिथे अर्ज दाखल केला आणि तिच्या प्रयत्नांना यश आले. सर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा मेसेज मोबाईल वर आला. व दिनांक सात एप्रिल 2021 मध्ये हरियाणातील प्रशिक्षण केंद्रात सहा महिने प्रशिक्षण घेऊन अरुणाचल प्रदेशात चीनच्या सीमावरती भागात अतिशय खडतर ठिकाणी नोकरीस सुरुवात केली. वैशाली पवार हिने प्रथम मागील चार वर्षाच्या कालावधीत आई-वडिलांसाठी नवीन घर बांधून दिले. दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी शुक्रवारी तिच्या विवाह निमित्ताने आई-वडिलांचा व वैशाली हिचा देखील स्वभाव मनमिळाऊ असल्याने आप्तेष्ट, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, आजी-माजी सैनिक तसेच मुंबई अग्निशमन दलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जातेगाव येथील श्री पिनाकेश्वर आजी-माजी सैनिक बांधव आणि मित्र परिवाराच्या वतीने 27 हजार रुपयांचा धनादेश वैशालीचे वडील वाल्मीक पवार यांना भेट म्हणून देण्यात आली. यावेळी वैशालीचे आई-वडील म्हणाले की मुलगाच वंशाचे नाव रोशन करतो. असे नाही. आम्हाला दोन मुली आहेत त्यापैकी मोठी मुलगी वैशाली हिने आई-वडिलांवर विसंबून न राहता स्वतःची कर्तबगारी दाखवून सैन्य दरात भरती झाली. एकेकाळी आम्हाला राहायला घर नव्हते. तिने ती जाणीव भरून काढली. नोकरी करून घराचे बांधकाम करण्यासाठी आर्थिक मदत केली. लहान बहिणीचे शिक्षण चालू आहे. स्वतःच्या लग्नाचा खर्च तिने स्वतः उचलला. यापेक्षा आणखी काय हवं असतं आई-वडिलांना अशी प्रतिक्रिया आई परिगाबाई आणि वडील वाल्मीक पवार यांनी दिली.
