
नाशिक (प्रतिनिधी) सालाबादप्रमाणे अमळनेर (जि. जळगाव) येथील प्राचीन नाथ संजीवन समाधी मंदिर येथे चैत्र वद्य वरुथिनी एकादशीनिमित्त गुरूवारी (दि. २४) परमपूज्य गोरक्षनाथ जयंती व चैतन्य नवनाथ महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी बुधवारी मोठ्या संख्येने नाशिककर भक्त मंडळी येथून जाणार आहे. या प्राचीन नाथस्थानावर योगी गोरक्षनाथांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे नवनाथ भक्त मंडळातर्फे या

स्थानावर नवनाथ चैतन्य महापूजेचे व पूज्य गोरक्षनाथ जयंतीचे आयोजन केले जात असून, गोरक्षनाथ जयंतीनिमित्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक व अमळनेर नवनाथ भक्त मंडळाने केले आहे. साधारणत: तेराव्या शतकातील अमळनेर-चोपडारोडवरील गायत्री शक्तिपीठामागे असलेल्या या नाथपंथीय समाधी मंदिराचे बांधकाम पूर्णत: दगडात असून, मंदिरात जाण्यासाठी तीन फुटांचे दगडी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सुमारे पाच फुटांच्या चौथऱ्यावर नाथपंथीय सिद्धांच्या दोन शिवलिंगाकार संजीवन समाधी आहेत. दिल्लीच्या अल्लाऊदिन बादशाहाने नाथपंथीय तोरणमाळ मठाला जी सनद करून दिली आहे, त्यात या स्थानाचा उल्लेख आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नाथ परिवारातर्फे करण्यात आले आहे

