
.नाशिक (प्रतिनिधी) : नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. *रविवार.20 एप्रिल2025* रोजी सकाळी 7:00 वाजता भक्ती नांदुर्डीकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. वैष्णवी भडकमकर , (तबला), अभिजीत भटजिरे (संवादिनी) यांची त्यांना साथसंगत लाभणार आहे. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.स्मिता मालपुरे या करणार आहेत.

मैफिलीचे हे 49 वें पुष्प असून विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे. विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. उदयोन्मुख कलावंताच्या प्रयोगशीलेचा अविष्कार रसिकांना दर महिन्याला अनुभवण्यास मिळत आहे.शास्त्रीय संगीताची मूलभूत आवड आणि त्यात नवे करण्याची आस यातून भक्ती यांचा प्रवास सुरू झाला. स्वरांचे अनोखे जग जगण्याचे नवे भान देते. ही त्यांची विचारधारा होती आणि त्यातूनच त्यांची वाटचाल सुरू आहे. शास्त्रीय संगीताचे सुरूवातीचे 9 वर्ष शिक्षण श्री. माधव दसककर यांचेकडे त्यांनी घेतले व त्यातून संगीत विषयक जाणीव विकसित होण्यास मदत झाली. त्यानंतर 3 वर्षे पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पं. चंद्रकांत नाईक यांचेकडून मार्गदर्शन घेतले व विदुषी किशोरी आमोणकर यांच्या शिष्या अपर्णा पणशीकर यांच्याकडून शिक्षण घेतले. शास्त्रीय संगीतातील परंपरा व आधुनिक जाणिवा यांचा अभ्यास होण्यास त्याची मदत झाली. सध्या त्या पं. शंकरराव वैरागकर व पद्मभूषण पं. अजय चक्रवर्ती यांचे शिष्य श्री. सागर कुलकर्णी यांचेकडून शिक्षण घेत आहेत. विविध गायन शैलींचा शोध घेण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन त्यांना मोलाचे ठरले आहे. याबरोबरच त्या बी.ए. व एम. ए. (संगीत) विषयात ‘अ’ श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबईतून ‘संगीत विशारद’ ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. त्यांना शास्त्रीय संगीतातील व्यासंग व अभ्यासू वृत्तीची ओळख होती. त्यांची संपन्न संगीत वाटचाल नव्याचा शोध घेणारी आहे. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर, ऋचिता ठाकूर व विनायक रानडे यांनी केले आहे.
