
नाशिक:(प्रतिनिधी)- जीवन जगत असताना अनेक अनुभवांनी माणूस शिकत असतो. यातूनच कथानकाचा जन्म होतो. अशाच माणसाला अंतर्मुख करणाऱ्या अनेक अति लघुकथा (अलक) माणसाच्या मनाचा ठाव घेतात, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध ‘अलक’कार सुभाष उमरकर यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ‘अंतर्मनातील अंतरंग’ या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तु.सी.ढिकले होते. उमरकर पुढे म्हणाले की, आजचे जग हे धावपळीचे आहे. त्यामुळे मोठी कथा लघुकथेत रूपांतर करून अलक हा प्रकार वापरून संक्षिप्त वाचन आपल्याला करता यावे, म्हणून या कथांची निर्मिती केली. कपाळावरच्या रेषा आणि पायाला पडलेल्या भेगा जाणून घेतल्याशिवाय आयुष्य बदलता येत नाही. यासाठी आपल्या भोवताली असलेल्या व्यक्तीच्या विचारांचा आणि वागण्या-बोलण्याचा मोठा प्रभाव पडू शकतो. सकारात्मक विचारच आपल्याला पुढे नेऊन जगण्याला बळ देऊ शकतात, असेही ते म्हणाले. प्रभावती चव्हाण आणि सुभाष पवार यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. कवी सोमनाथ साखरे यांनी केले. योगाचार्य अशोक पाटील यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (दि.१८) सुजाता येवले या ‘एक्स्चेंज ऑफर’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
