
आबालवृद्धांसाठी लेखन करणारे, छापील पुस्तके, ई- पुस्तके यांची शंभरी ओलांडणारे, नवागतांच्या लिहित्या हाताला बळ देणारे म्हणून ख्यातकीर्त साहित्यिक मित्रवर्य अरुण वि. देशपांडे यांचा ‘मराठी भाषा गौरव दिन’ २७ फेब्रुवारी २०२५ रोजी संवेदना प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेला आणि शीर्षकाचा आशय स्पष्ट करणारे संतोष घोंगडे यांचे आकर्षक मुखपृष्ठ लाभलेला ‘मला कवीचा चष्मा लागला’ हा काव्यसंग्रह वाचण्यात आला. सुरुवातीला शीर्षक थोडे वेगळे वाटले परंतु कवी देशपांडे यांचे मनोगतातील प्रांजळ स्पष्टीकरण वाचून कवीवर्य अरुणजी यांच्या बद्दलचा आदर दुणावला. कवीची लेखनाची तळमळ पाहून मन भारावले. कारण कविमित्र अरुण देशपांडे यांना मी चाळीस वर्षांपासून ओळखतो. साहित्य निर्मिती करताना अनेक साहित्य विषयक उपक्रमांचे ते आयोजक होते. त्यामुळे साहित्य चळवळीतला दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. या संग्रहात विविध विषयांवरील एकूण पंच्याऐंशीपेक्षा अधिक वाचनीय कविता आहेत. कवितेची संख्या अधिक वाटत असली तरीही काव्य कंटाळवाणे नाही. कवी देशपांडे यांच्या लेखणीत गोडवा आहे, शब्दांमध्ये मनोरंजनातून ज्ञान आहे, संदेश आहे, सामाजिक जाणीव आहे, पाऊस आहे, मैत्री आहे, आठवणी आहेत, गाव नि निसर्ग आहे, आई आहे, एकांत आहे, हळवेपण आहे, मन आहे, प्रसन्न करणारा श्रावण आहे. एकूण काय तर लेखणीला विषयाचा शोध घ्यावा लागत नाही तर अनेकानेक विषय कवीला शोधत येतात. हे देशपांडे यांची साहित्यावरील निष्ठा,प्रेम इत्यादी बाबींचे द्योतक आहे. सातत्याने साहित्याच्या प्रांगणात रमणारे अरुण देशपांडे यांना मैत्र जोडण्याचा छंद आहे. नुसतीच मैत्रीची वीण ते गुंफत नाहीत तर संपर्कात आलेल्या लेखकाला, मित्राला ते मदत करतात. त्याच्या आनंदात स्वतःचे समाधान शोधतात. मित्राच्या उत्कर्षाने आनंदित झालेले देशपांडे ‘घे मित्रा तू उंच भरारी’ या कवितेत म्हणतात…जा मित्रा असाच तू,घेत उंच उंच भरारी राहुनी जमिनीवर, पाहीन मी किमया सारी। ‘मला कवीचा चष्मा लागला’ ही काव्यसंग्रहाचे शीर्षक लाभलेली कविता वाचनीय आहे. इतर लेखकांच्या, माणसांच्या संपर्कात आल्यामुळे मानवाचा कसा विकास होतो, विचारांची दिशा कशी बदलते यासोबत प्रत्येक गोष्टींवर सखोल विचार करणे कसे हितावह असते ते कवी स्पष्ट करतात…मला कवीचा चष्मा लागला डोळ्यांना खोल नजर आली, वरवर पाहणे ते चुकीचे सारा कचरा साफसूफ झाला… साहित्य चळवळ जवळून पाहणारे, साहित्य संमेलनाचे आयोजक या नात्याने आणि कवी संमेलनातील घडामोडी यावर हक्काने, स्वानुभवाने देशपांडे यांची लेखणी ‘मैफल’ या कवितेत पोटतिडकीने लिहिते. एक सर्वानुभव ते मांडतात. कवी संमेलनाची सुरुवात होते तेव्हा व्यासपीठावर इतकी गर्दी असते की, अनेक कवींना बसायला जागा मिळत नाही. काव्याची मैफल जसजशी रंगत जाते, तसतशी व्यासपीठावरील कवींची संख्या रोडावत जाते. अनेक कवी स्वतःच्या ओळखीचा फायदा घेत किंवा कुणाच्या ना कुणाच्या शिफारशीने स्वतःचा क्रमांक लावून घेतात. कविता वाचून झाली की, जणू संमेलनाची इतिश्री झाली अशा थाटात निघून जातात, ह्या वृत्तीवर कवी प्रकाश टाकतात…कविता झाली निघून ते ते जाती खाली, सतरंजी रिकामी होत होती ।। जोशात कवी टेचात छाप पाडी, शब्दांत कविताच तेवढी नव्हती ।। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. सर्वत्र आनंदाचे भरते आले. परंतु, असा कोणता फरक पडला? इतर भाषिकांचे सोडा परंतु मराठी भाषेचा पुळका असणारांची मराठी भाषेबद्दलची वागणूक कशी आहे? आपण घरात मराठी भाषा कितपत वापरतो, हे सारे जवळून अनुभवणारे कवी देशपांडे पोटतिडकीने ‘आपली मराठी’ या कवितेत भाष्य करतात…माय-लेकरांनी बोलावी मराठी सांगणे, मागणे असावे मराठी, ठसक्यात बोलू आपली मराठी मराठी घरात असावीच मराठी… आज सर्वसाधारणपणे पतीपत्नी दोघेही नोकरी, व्यवसाय करणारे आहेत. अनेकदा नोकरी निमित्ताने पती-पत्नीला एकमेकांपासून दूर राहावे लागते. अशावेळी दोघांच्या मनाची जी अवस्था होते ती कवी देशपांडे यांनी ‘वाऱ्यावरती मन हे डोलते’ या काव्यात भावनाविवश शब्दात मांडली आहे…दोन ठिकाणी दोघे असता भेटणे अवघे असे कठीण, रात्र सरते ती चांदण्याविण उजाडे दिवस, तोही कठीण… कवी देशपांडे यांनी ‘आनंदाचे लेणे’ या काव्यातून एक फार जीवनोपयोगी, निरोगी राहण्यासाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. वाईट चिंतणे इतरांचे क्लेशच देते सदा मना, असूया, मत्सर त्यागता लाभेल समाधान मना… कोणत्याही वयातील सासुरवाशीण असो, ती स्वतःच्या संसारात रमलेली असतानाही तिच्या मनात एक हळुवार कोपरा असतो. त्यात माहेर नावाचे विश्व सामावलेले असते. तिथल्या व्यक्ती, तिथल्या आठवणी त्या कोपऱ्यात जीवापाड जपून ठेवलेल्या असतात. कविवर्य देशपांडे यांनी ह्या कोपऱ्यातील तगमगीला शब्दरुप दिले आहे…मुक्काम सरता जीव होई जड। डोळ्यांकाठां पाणी मनी धडधड ।। भारतीय संस्कृती! भारतीयांच्या एकतेला, समानतेला, विविधतेला एकत्र गुंफणारी एक फार मोठी देणगी आपणास लाभली आहे. या संस्कृतीचा जसा भारतीयांना अभिमान आहे, तसेच इतर देशातील लोकही तिचे गोडवे गातात. कविवर्य देशपांडे ‘भारतीय संस्कृती’ या कवितेत लिहितात…एकतेत विविधता हीच भारतीय संस्कृती, जगात साऱ्या गोडवे गाती अशी वैभवशाली भारतीय संस्कृती… कविवर्य अरुण देशपांडे यांच्या अनुभवातून उतरलेल्या, साध्या- सरळ शब्दांत व्यक्त झालेल्या काव्याचा आनंद घेणे ही अलौकिक अनुभूती आहे. वेगवेगळ्या आशयघन कविता मन प्रफुल्लित करतात. कवी देशपांडे यांना लागलेल्या कवीच्या चष्म्यातून भविष्यात विविध अनुभव, साहित्यकृती वाचायला मिळाव्यात ही अपेक्षा! ———मला कविचा चष्मा लागला : काव्यसंग्रह कवी : अरुण देशपांडे (९८५०१७७३४२) प्रकाशक : संवेदना प्रकाशन, पुणे मुखपृष्ठ: संतोष घोंगडे पृष्ठ संख्या : ९६मूल्य : ₹ १५०/-आस्वाद: नागेश शेवाळकर, पुणे (९४२३१३९०७१) ००००
