
प्रतिनिधी, नाशिक
मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्यभारती संस्थेच्या नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने पळसे गावी कविसंमेलन घेण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय साहित्य परिषद हिंदी साहित्य नाशिक जिल्हा अध्यक्ष डॉ.सी.पी.मिश्रा, नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ.प्रशांत भरवीरकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती तर पळसे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. मराठी भाषा अजरामर असून जोपर्यंत आपण आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये शिक्षण घ्यायला लावू तोपर्यंत मराठी अबाधित आहे, असे सांगताना अध्यक्ष विष्णुपंत गायखे यांनी मराठी साहित्यात मूलभूत लेखन होत नसल्याची खंत व्यक्त केली. मिश्रा यांनी आज जागतिक पातळीवर मराठीची कशी गरज आहे, याबाबत काही दाखले देत कुसुमाग्रज, कानेटकर यांच्या कार्याचा गौरव केला. साहित्यभारतीच्या वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा घेत भविष्यातील कार्यक्रम याबाबत जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत भरवीरकर यांनी सांगितले.
यावेळी पंचवीसहून अधिक कवींनी सहभाग घेत आपल्या कविता सादर केल्या.
कार्यक्रमाप्रसंगी साहित्य भारतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष अरुण ठोके, नाशिक जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी किरण भावसार व आरती शिरवाडकर हे उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील संजीव अहिरे, तुकाराम ढिकले, सु.द.जाधव, डॉ. धर्मेंद्र मुल्हेरकर आदींसह कवी उपस्थित होते. सूत्रसंचालन मनीषा दिघे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामीण साहित्यिक रा.रं. बोराडे, प्रवासवर्णन लेखिका मीना प्रभू व कवी प्रशांत धिवंदे यांना श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
चौकट
सामाजिक आशयाच्या कवितांनी गाजवले व्यासपीठ
कविसंमेलनात शेतकरी आत्महत्या, मराठी भाषा सद्यस्थिती, स्त्री ची अवस्था, प्रेम, तरुणाई अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कविता सादर करण्यात आल्या. यावेळी कृष्णा बोराडे यांना प्रथम, देव थोरात यांना द्वितीय तर पूर्वा पाळदे यांना तृतीय पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
