
नाशिकरोड:-( प्रतिनिधी ) गौतम बुद्ध, शिवराय, संत तुकाराम, महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ.आंबेडकर अशा महामानवांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांची शिकवण आपल्याला दिली. एकतेची शिकवण समाजात रुजवणाऱ्या डॉ.आंबेडकर यांचे कार्य दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन युवावक्ते संतोष गायधनी यांनी केले. पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालय आणि आदर्श प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. मंचावर वडगाव पिंगळाचे पोलीस पाटील सागर मुठाळ, सागर गायधनी, मुख्याध्यापक अरुण पगार, चंद्रकांत खानकरी, सांस्कृतिक विभागप्रमुख कैलास लहांगे यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. श्री गायधनी पुढे म्हणाले की, डॉ.आंबेडकर हे जगातील सर्वात विद्वान महामानव. उत्तमतेचा ध्यास घेत अनेक भाषांमध्ये पारंगत असलेल्या आंबेडकरांनी प्रयत्नवाद आणि विज्ञानवाद याची सांगड घालून उत्तम कार्य केले. संविधानाच्या माध्यमातून भारतीय लोकशाहीला अधिक बळकट करणाऱ्या आंबेडकरांचे विचार हे म्हणूनच अतिशय महत्त्वाचे आहेत, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पोलीस पाटील संघटनेच्या सिन्नर तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे माजी विद्यार्थी सागर मुठाळ यांचा सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री.मुठाळ यांनी आपल्या जडणघडणीसह नेतृत्वगुण विकसित करण्यात शाळेचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. ईशान सानप, ईश्वरी गिते, सृष्टी सरोदे या विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकर यांच्या जीवनप्रवासावर विचार मांडले. दीपाली राठोडसह धन्वंतरी गायधनी आणि सहकारी विद्यार्थिनींनी गाणी सादर केली. मुख्याध्यापक अरुण पगार यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविधांगी कार्याबद्दल मार्गदर्शन केले. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.फोटोओळी:- नासाका विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन करताना युवावक्ते संतोष गायधनी, वडगाव पिंगळाचे पोलीस पाटील सागर मुठाळ, सागर गायधनी, मुख्याध्यापक अरुण पगार, चंद्रकांत खानकरी यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी.
