
✍️ शब्दांकन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तिमत्व, विनोदी लेखक, नाटककार, दिग्दर्शक, संगीतकार आणि सामाजिक कार्यकर्ते पु. ल. देशपांडे यांचा १२ जून आज २६ वा स्मृतिदिन. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…
● माणसाला जे जे हवं
ते ते मिळालं असतं
तर जगायला गंम्मत आणि
देवाला किंमत राहिली नसती.
पु ल देशपांडेवर इतकं काही लिहिल्या गेलंय आणि इथून पुढेही इतकं काही लिहिल्या जाईल की अजून चार शब्द खरडणे हे चीनच्या भिंतीला अजून दोन विटा लावण्यासारखं आहे.
● जणू लोकांच्या जीवनात भरभरून आनंद निर्माण करण्यासाठीच त्यांचे पृथ्वीतलावर आगमन झाले असावे. पु ल म्हणतात, “मी लोकांना काय दिले याचा मी हिशोब कधीच ठेवला नाही, पण रसिकांनी मात्र त्यांची एक बहुमोल गोष्ट मला दिली ती म्हणजे हास्य”. लहानपणापासूनच माझ्या मनी मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील “एक जिप्सी” दडून बसला होता.”एक विदूषक”,”एक गायक” ,”एक लेखक” माझ्या मनी नित्य वस्तीला असत. “तू माझा सांगाती” या न्यायाने कोणी जन्माची साथ दिली असेल तर ती “रवींद्रनाथ टागोर” आणि “चार्ली चॅपलीन” यांनी. तेच माझे “प्रेरणास्थान” बनले आणि हजारो व्यक्तिरेखा जन्मल्यात. “गुळाचा गणपती” या “सब कुछ पु ल” असलेल्या चित्रपटातील “नाऱ्याच्या” भूमिकेतून पदोपदी “चॅपलीन” डोकावतो..!! “पुढचं पाऊल” मधील ढोलकी वादक “कृष्णा महार” त्यांनी हुबेहूब साकारला. “जोहार मायबाप जोहार” मधील त्यांनी साकारलेली “चोखामेळ्याची” भूमिका हृदयस्पर्शी अशीच होती. “अमृतसिद्धी गौरव ग्रंथात” म्हटले आहे की त्यांचे “जावे त्यांच्या देशा” वाचून “कवी बोरकर” हेलावले. त्यातील “निळाईची गुहा” हा लेख तर त्यांना एखाद्या महाकाव्याचा “कळसाध्याय” वाटला. त्यांचा “बालगंधर्व” विशेषांकातील “जोहार मायबाप जोहार” हा व्यक्तिचित्राचा वस्तुपाठ होय.
● पुलंचे साहित्य म्हणजे “विविधरंगी फुलांनी नटलेली फुलबाग”. त्यांचे जीवनाचे तत्वज्ञान निर्भय, नितळ आहे. त्यांचे माणसावरील प्रेम अफाट आहे. “एका ठिकाणी थांबणे” हे त्यांच्या रक्तातच नाही. त्यांचे उज्ज्वल भविष्य वडिलांनी ओळखले होते आणि “तू याचे मोठमोठे मान सन्मान बघशील” असे आईला सांगितले होते. वडिलांचे आशीर्वाद फळाला आले. उत्तम कलाकृतीने पुल जसे भारून जात ,तसेच आज आपण त्यांच्या दर्जेदार साहित्याने भारावून जातो. “शब्दांची पालखी करावी आणि त्यात मानाने त्यांना बसवून आपण पालखीचे भोई व्हावे” याने सुद्धा त्यांचे ऋण फिटणे नाही…!
● आपल्या अभिजात लेखन शैलीमुळे आणि कथा सांगण्याचा विशिष्ट पद्धतीमुळे पु.ल. कायमच स्मरणात आहेत. हजर जबाबीपणा हा त्यांचा खास गुण होता. आपल्या लेखनातून ते जे पात्र उभं करत ते त्याची थेट भेट घडवून आणत. पुलं हे एक प्रॅक्टिकल विचारवंत होते. त्यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखाही तशाच होत्या. चितळे मास्तर कितीही थोर असले तरी, त्यांच्या झिजलेल्या पायताणाकडे दुर्लक्ष करता येतं नाही, हरितात्या इतिहासात रमले म्हणून त्यांची परवड थांबत नाही. नारायण कितीही श्रमला तरी त्याच्या अंगावर कुणी दुसरं येऊन पांघरून घालत नाही. हसवता हसवता अंतर्मुख करणारा हा शेवट, खरातर अतिरेकापासून सावध करत असतो. पुलंचा “मी” असे अतिरेक टाळत, हवतर तडजोडी करत पुढे जातं असतो. पुलंच्या मागून मध्यमवर्गही अशाच तडजोडी करत पुढे जातं राहिला. भाई हे त्यांना पडलेलं टोपणनाव होतं. पु.ल. देशपांडे यांच्या खास लेखन शैलीमुळे महाराष्ट्राने त्यांच्यावर अमाप प्रेम केलं. नारायण, हरितात्या, पानवाला, म्हैस, पाळीव प्राणी, रावसाहेब या आणि त्यांच्या अशा अनेक कथा आजही अनेकांना तोंडपाठ आहेत. पु. ल. देशपांडे नावाचं गारुड आजही महाराष्ट्राच्या मनावर कायम आहे.
“दिव्यत्वाची जेष्ठ प्रचिती तेथे कर माझे जुळती”
● मंगेश पाडगावकर म्हणतात…
पुलस्पर्श होताच दु:खे पळाली
नवा सूर आनंदयात्रा मिळाली
निराशेतुनी माणसे मुक्त झाली
जगू लागली हास्य गंगेत न्हाली…
हेच खरे…!!
