
सिन्नर( वसंत गोसावी, प्रतिनिधी:) ता. 5 : सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथील डगळेमळा या आदिवासी वस्तीने एक नवा इतिहास घडविला असून एकाच आठवड्यात विविध शासकीय सेवांमध्ये आठ युवकांची निवड झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोलमजुरी करून संसार चालविणाऱ्या कुटुंबांतील या युवकांनी जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या बळावर यश संपादन करत आदिवासी समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. भारतीय सैन्य दलात वैभव लहानु बेंडकुळे, तेजस कैलास खेताडे, रोशन दत्तात्रय डगळे, अमोल रंगनाथ डगळे आणि जीवन मच्छिंद्रनाथ डगळे यांची निवड झाली आहे. तसेच संजय रामदास गभाले यांची मुंबई पोलीस दलात, आकाश वाळू डगळे यांची एसआरपीएफमध्ये तर सागर गोविंद डगळे यांची एसटी महामंडळाच्या धुळे आगारात निवड झाली आहे. या सर्व यशस्वी उमेदवारांचे गावात सवाद्य मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना सिन्नर येथील ज्ञानदा अकॅडमी यांची बरोबरच गावातील पर्सनल करिअर अकॅडमीचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पी. व्ही. पवार, शरद रत्नाकर यांचे देखील मार्गदर्शन लाभले आहे. यावेळी सिन्नरचे माजी नगराध्यक्ष किरण डगळे, ज्ञानदा करिअर अकॅडमीचे संचालक सुदाम शेळके, सामाजिक कार्यकर्ते विष्णू डगळे, पंचायत समितीचे माजी सदस्य मच्छिंद्र डगळे, मुख्याध्यापक सोपान डगळे, माजी उपसरपंच पंढरीनाथ डगळे, तानाजी पवार, सौ. रोहिणी डगळे, सोसायटीचे संचालक दत्तू डगळे, युवराज डगळे, शिवाजी बेंडकुळे, संजय शहाणे, कुंडलिक डगळे, शिवाजी डगळे, विलास डगळे, कुणाल डगळे, अक्षय डगळे चिंतामण डगळे दिलीप डगळे मंगेश डगळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रांतिकारक राघोजी भांगरे मित्र मंडळ आणि कळसूबाई मित्र मंडळ यांच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. डगळे मळा येथील बहुतांश कुटुंबे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. या कुटुंबांमध्ये प्रथमच शासकीय नोकरीचा लाभ मिळाल्याने पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. शिक्षणाचे महत्त्व ओळखून आदिवासी समाजातील युवकांनी केलेल्या अथक परिश्रमांना यशाचे फळ मिळाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
“शिक्षण, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आदिवासी वस्तीतील युवकांनी यशाचे शिखर गाठत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे,” :- श्री. किरणजी डगळे माजी नगराध्यक्ष, सिन्नर.
डगळेमळा येथील या यशामुळे परिसरातील इतर विद्यार्थ्यांनाही शिक्षण व स्पर्धा परीक्षांकडे प्रेरणा आहे. : विष्णू डगळे, सामाजिक कार्यकर्ते
