
नांदगाव: ( प्रतिनिधी ) मविप्र संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अत्यंत उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. वाढते प्रदूषण आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयाच्या आवारात परिसराची शोभा वाढवणाऱ्या आणि पर्यावरणाला पूरक असणाऱ्या विविध औषधी व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने: चिंच, लिंब, करंजी, पारिजात, इ.
यांसारख्या बहुगुणी रोपांचा समावेश होता.
हा कार्यक्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडला. वृक्षारोपण करताना त्यांनी विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व पटवून दिले. “केवळ वृक्षारोपण करून न थांबता, लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करून ते जगवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,” असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी स्वतः खड्डे तयार करून, त्यात खत-माती टाकून रोपे लावली व त्यांना पाणी दिले. पर्यावरण रक्षणाची शपथ घेत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
