
नाशिक:( प्रतिनिधी )- निसर्गाचा भरभरून सहवास लाभलेल्या रानकवी ना.धों.महानोर यांची गाणी वास्तवतेचा अंगीकार करणारी आहेत. त्यांच्या गीतांमध्ये निसर्गाबरोबरच मानवी मूल्यांची प्राधान्याने जोपासना दिसून येते, असे प्रतिपादन प्रसिद्ध समीक्षक डॉ.तुषार चादंवडकर यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ते ‘महानोरांची गीतरचना’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सुहास टिपरे होते.
डॉ.चांदवडकर पुढे म्हणाले की, कविता नुसती आवडणारी नसावी तर ती भावणारीही असली पाहिजे. ना.धों.महानोरांनी लिहिलेल्या गीतांमुळे चित्रपटांना यश मिळाले. जैत रे जैत, एक होता विदूषक, सर्जा, मुक्ता अशा अनेक चित्रपटांची गाणी लिहिताना निसर्ग आणि वास्तव चितारल्याने ह्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. निसर्गाच्या सानिध्यात हयातभर राहिल्याने महानोरांना निसर्ग वाचता आला आणि जवळून पाहता आला, असे सांगून त्यांनी महानोरांची काही गाणी सादर केली.
डॉ.शोभा सातभाई आणि जयश्री मराठे यांना ग्रंथभेट देण्यात आली. मधुकर गिरी यांनी सूत्रसंचालन तर सुरेश पवार यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (दि.५) पिंपळगाव जलाल येथील कवी प्रशांत वाघ ‘वेदनांकुर’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
