
सुमन कल्याणपुर
एप्रिल महिन्यापासूनच भारतीय चित्रपट संगीताच्या व साहित्य क्षेत्रातील दिग्गजांचे निधन झाल्याने काहीसे पोरके झाल्यासारखे वाटत आहे.
12 एप्रिल रोजी आशाताई भोसले यांचे दुःखद निधन झाले. एक अष्टपैलू स्वर संपला. गेल्या दोनच दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी बशीर बद्र हे नामांकित उर्दू शायर/गझलकार अल्लाला प्यारे झाले. आज आत्ता सुमन कल्याणपूर यांच्या निधनाची दुःखद बातमी आली. आणि हे दुःख मला काटेरी सल देऊन गेले.
भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळातील अत्यंत मधुर स्वरांची तसेच प्रतिभावान गायिका, ज्यांच्या आवाजातील गोडवा आणि शास्त्रीय संगीताची भक्कम पायाभरणी आणि अत्यंत भावपूर्ण गायन यामुळे हिंदीच नव्हे तर मराठी आणि इतरही भाषेतील पार्श्वगायन क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली.
सुमन कल्याणपुर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी आत्ताच्या बांगलादेशातील “ढाका” येथे झाला. सुमन हिमाडी असे त्यांचे नाव होते. खरे तर त्या मूळच्या कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील. लहानपणापासूनच त्यांना संगीत आणि चित्रकलेची आवड होती. त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेऊन चित्रकलेला न्याय दिला. तर याच काळात पंडित केशवराव गोळे आणि इतर गुरूकडून शास्त्रीय संगीतांचे धडे घेतले. त्यांच्या गायन कारकिर्दीची सुरुवात 1950 ते 1970 च्या दशकात चांगली झाली. त्यांनी केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, भोजपुरी, पंजाबी आणि इतर अशा अनेक भाषांमध्ये गीते गायली आहेत.
मराठी संगीत क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे. भावगीत, भक्तीगीत आणि चित्रपट गीतांच्या माध्यमातून त्यांनी मराठी रसिकांना असंख्य अविस्मरणीय गीते दिली. त्यात केतकीच्या बनी येथे नाचला ग मोर, लिंबोणीच्या झाडामागे, नाविका रे, देव माझा विठू सावळा, केशवा माधवा, वाट इथे स्वप्नातील संपली जणू, पहिलीच भेट झाली, जीवनात ही घडी अशीच राहू दे, कशी करू स्वागता, रिमझिम धरती श्रावणधारा, लिंब लोण उतरू कशी. शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी अशी एकापेक्षा एक आपल्या नावाप्रमाणेच “सुमन” म्हणजेच फुलासारखी नाजूक अशा स्वरातून त्यांनी आपल्याला ती गीते पेश केली. हिंदीत मेरा प्यार भी तू है,- ये बहार भी तू है, आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हे जबान पर, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, अजहून आये बालमा अशी अवीट गाणी त्यांनी गायली. एका बाजूला आपल्या आवाजातील कोमलता तरलता आणि प्रासादिकता तर दुसरीकडे तितकेच स्पष्ट उच्चार हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या संगीत क्षेत्रातील या योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना 2009 मध्ये लता मंगेशकर पुरस्कार प्रदान केला. तर भारत सरकारने 2023 मध्ये देशातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान “पद्मभूषण” या पुरस्काराने गौरविले. यांच्या मधुर स्वरांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला असून भारतीय संगीत विश्वात त्यांचे स्थान कायम अढळ असेल. त्यांच्या गाण्यांचा मधुर ठेवा भविष्यातही संगीत प्रेमींना प्रेरणा देत राहील, हे नक्की! त्यांच्या स्वराला लता मंगेशकर यांच्या स्वराचा भास होता असं म्हटलं तर हरकत नाही. मला आठवते तसे – एका गाण्याविषयी माझी आणि माझ्या एका चित्रपट संगीतातील जाणकार मित्राशी पैज लागली की हे विशिष्ट गाणे कोणाचे आहे? मी सहजपणे म्हणालो की ते लता मंगेशकर यांचे आहे. परंतु त्याने माझे म्हणणे सोदाहरण खोडून काढले आणि सिद्ध केले की तो स्वर्गीय स्वर सुमन कल्याणपुरकर यांचा होता. सुमन कल्याणपुरकर या जेव्हा पार्श्वगायन या क्षेत्रात आल्या त्यावेळी लता मंगेशकर यांचे नाव प्रचंड आघाडीवर होते. अगदी मक्तेदारी म्हटले तरी चालेल. आणि सोबतीला स्पर्धेत आशाताई होत्या. त्यामुळे असे म्हणतात की, लता मंगेशकर यांनी त्यांना जाणीवपूर्वक पुढे येऊ दिले नाही. परंतु सुमनतेच्या ऋजू स्वभावाने त्या गोष्टीचा कधीही उल्लेख केला नाही. किंवा त्रागाही केला नाही. आपले सुमन हे नाव त्यांनी सिद्ध केले. कारण फुलाला चुरगाळले तरी त्याचा सुगंध देणे हे त्याचे काम असते हे त्यांना पक्के ठाऊक होते. परंतु का कुणास ठाऊक हा आरोप त्यांनी कधीही आपल्या मुलाखतीत येऊ दिला नाही! त्यांचा स्वभाव ही अत्यंत ऋजू ! तसाच चेहऱ्यावर सरस्वतीचे तेज असल्याचा भास आपल्याला होतच असतो. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🌹
प्रसाद अतनूरकर. सोलापूर.
9422465501.
