
नांदगाव (प्रतिनिधी) : विजय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. पी. पी. मवाळ विद्यालय, पिंपरखेड येथील उपशिक्षिका श्रीमती अलका द. शिंदे यांनी नियमित वयोमानानुसार ३१ मे रोजी वीस वर्षांची प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवा पूर्ण करून सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला.

मुख्याध्यापक तथा गझलकार काशिनाथ गवळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास शाळेचे माजी मुख्याध्यापक आर. आर. मवाळ, बी.एड. महाविद्यालय नांदगावचे प्राचार्य विक्रम घुगे, संदिप मवाळ, श्रीमती दीपाली घुगे, अंबादास वाघापुरे, पुरकर काका, संजय कांदळकर, कैलास पठाडे, लक्ष्मण जाधव, श्रीमती पारखे मॅडम, निलेश चव्हाण, आबासाहेब सोनवणे तसेच सत्कारमूर्ती श्रीमती अलका शिंदे व प्रा. सुरेश नारायणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक काशिनाथ गवळी यांनी सांगितले की, “अलका शिंदे मॅडम यांनी गेल्या वीस वर्षांत शाळेची गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमाचे ज्ञान दिले नाही, तर जीवनमूल्यांची शिकवणही दिली. प्रामाणिकपणा, शिस्त, परिश्रम, निष्ठा आणि माणुसकी यांचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे.”

प्रास्ताविक करताना संजय कांदळकर यांनी शिंदे मॅडम यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “शालेय जीवनात मार्गदर्शक व बहिणीची माया देणाऱ्या आमच्या आदर्श शिक्षिका आज सेवामुक्त होत आहेत, ही कल्पनाच मनाला वेदना देणारी आहे.”

माजी मुख्याध्यापक आर. आर. मवाळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “मॅडम यांच्याकडे सोपविलेले कोणतेही काम उत्कृष्टरीत्या पूर्ण होणार याची खात्री असायची. चौदा वर्षे त्या माझ्या सहकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कामाबाबत कधीही कुरकुर नव्हती. त्या विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय शिक्षिका होत्या.”
सत्काराला उत्तर देताना प्रा. सुरेश नारायणे म्हणाले, “एक पत्नी म्हणून अलका मॅडम यांचा जीवनसंघर्ष मी जवळून पाहिला आहे. घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी निष्ठेने कार्य केले. त्यांनी स्वतःची मुले घडविली तसेच असंख्य विद्यार्थ्यांचेही भविष्य उज्ज्वल केले.”

प्राचार्य विक्रम घुगे यांनी आपल्या शुभेच्छापर मनोगतात सांगितले की, “आज त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिवस असला तरी त्यांच्या कार्याचा, संस्कारांचा आणि प्रेरणेचा प्रवास कधीही थांबणार नाही. त्यांनी घडविलेली प्रत्येक पिढी त्यांच्या कार्याची साक्ष देत राहील.”
आपल्या भावना व्यक्त करताना श्रीमती अलका शिंदे म्हणाल्या की, “सेवेत रुजू झाल्यापासून मला सर्व शिक्षक सहकारी, संस्था पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समिती, पालकवर्ग आणि गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस वसंत बापू मवाळ, संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या पाठबळामुळेच मी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकले.”
यावेळी चिखली नगर परिषद आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे, राजेंद्र सोनटक्के, निर्मला लासुरे, गोकुळ बोरसे, संतोष बोराडे, सौ. अलका बोराडे, संगीता जोगदंडे, सम्राट जोगदंडे आदी मान्यवरांनीही त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

शाळेच्या वतीने श्रीमती अलका शिंदे (नारायणे) व प्रा. सुरेश नारायणे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच शिंदे मॅडम यांनी शाळेला सप्रेम देणगीही प्रदान केली.
कार्यक्रमाचे आभार लक्ष्मण जाधव यांनी मानले. त्यानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
