
श्रीमती यशोदामाई काकड यांचा ९२वा अभीष्टचिंतन सोहळा
नाशिक:-( प्रतिनिधी)
‘माय लक्ष्मी नि अहिल्या/माय सावित्री-रमाई
माय शिवाची जिजाऊ/देई स्वराज्याचा लढा!’
या युवाकवी प्रशांत केंदळे यांच्या भावगर्भ ओळींसह आईबद्दलच्या विविध कवितांच्या हृदयस्पर्शी आणि लयबद्ध सादरीकरणाने उपस्थितांचे डोळे पाणावले.
निमित्त होते मखमलाबाद येथील मातोश्री यशोदामाई काकड यांच्या ९२व्या वाढदिवसाचे! ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती काकड (जय गुरुदेव) यांनी आपल्या मातोश्रींचे अभीष्टचिंतन ‘माय अमृताचा घडा’ या ज्येष्ठ कवी राजेंद्र सोमवंशी, रवींद्र मालुंजकर आणि प्रशांत केंदळे यांच्या मैफिलीद्वारे केले.
कवी प्रशांत केंदळे यांनी पुढे ‘आजी’ या कवितेत-
‘वृद्ध असली आजी तरी/तिला जपावं लहानांसारखं
मग आयुष्याच्या प्रगतिपुस्तकात/मिळतील तुम्हाला शंभरपैकी शंभर मार्क!’
या ओळींना श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रतिसाद दिला. कवी राजेंद्र सोमवंशी यांनी ‘माझी आई गोड आहे, जशी पेरूची फोड आहे!’ या बालकवितेसह-
‘दिस उलटून जातो/होते सांज नवलाई…
होई सावली काळोख/तेव्हा आठवते आई!’
यासारख्या गेय आणि मुक्तछंदातील कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कवी रवींद्र मालुंजकर यांनी मैफिलीचे निवेदन करताना ‘ऐका ऐका दोस्त हो मायबापाची कहाणी, बाप नारळी खोबरं माय नारळाचं पाणी’ ही संतोष नारायणकर यांची कविता सादर करून रंग भरले. मैफिलीमध्ये प्रशांत असनारे, फ.मुं.शिंदे, प्रा.स.ग.पाचपोळ, प्रशांत मोरे, कवी ग्रेस, सुरेश भट यांसारख्या नामवंत कवींच्या कविता सादर करण्यात आल्या. संजय बडवर, अंजना थेटे यांनीही कविता सादर केल्या.
काकड परिवाराला कष्टाच्या पुण्याईने आज नावारूपाला आणणाऱ्या यशोदामाई काकड यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना उपमहापौर विलास शिंदे यांचे डोळे पाणावले. विजय हाके, विनोद शहा, दीपक बागड, अन्नुदादा मोरे, पंचवटी प्रभाग सभापती रोहिणी पिंगळे, नगरसेवक वाळू काकड (पहिलवान), प्रवीण जाधव, कमलेश बोडके, नगरसेविका दीपाली गीते यांच्यासह यशोदामाईंच्या माहेरचे गणगोत, ग्रामस्थ आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक आणि स्वयंसेवक हजर होते.
