दि.३० मे २०२६ रोजी अमरावती येथे संपन्न होत असलेल्या सामुदायिक प्रार्थने निमित्त गुरुदेव भक्त श्रीकृष्ण पखाले यांचा लेख
मानवतेचे महान पूजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मानवतेच्या कल्याणासाठी आणि विश्वशांतीच्या स्थापनेसाठी सामुदायिक प्रार्थनेचा विचार समाजासमोर ठेवला. ही प्रार्थना केवळ धार्मिक विधी नसून मानवतेला एकत्र आणणारी, माणसाच्या अंतःकरणाला स्पर्श करणारी आणि समाजात प्रेम, शांतता व बंधुभाव निर्माण करणारी उपासना आहे. म्हणूनच सामुदायिक प्रार्थना ही आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीयतेची दिव्य अनुभूती मानली जाते.
सामुदायिक प्रार्थनेतील आध्यात्मिकता ही माणसाच्या अंतःकरणातील अहंकार, द्वेष, मत्सर आणि अस्वस्थता दूर करून मनाला शांतता देते. ती माणसाला आत्मपरीक्षणाची आणि आत्मशुद्धीची प्रेरणा देते. प्रार्थनेच्या माध्यमातून मनुष्य स्वतःच्या अंतर्मनाशी जोडला जातो आणि मानवतेच्या व्यापक भावनेशी एकरूप होतो. येथे कोणत्याही एका धर्माचा आग्रह नसून सर्व धर्मांचा आदर आणि विश्वकल्याणाची भावना आहे. त्यामुळे सामुदायिक प्रार्थना ही मनाला उन्नत करणारी आणि जीवनाला सकारात्मक दिशा देणारी आध्यात्मिक साधना ठरते.
सामुदायिक प्रार्थनेतील सामाजिक स्वरूप हे आज समाजात जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत आणि विचार यांच्या नावावर भिंती निर्माण होत आहेत. माणूस माणसापासून दूर जात आहे. अशा परिस्थितीत सामुदायिक प्रार्थना समाजाला एकत्र आणण्याचे कार्य करते. येथे सर्वजण समान पातळीवर एकत्र येतात,कुणी उच्च-नीच नाही. प्रेम, सहकार्य, बंधुभाव आणि परस्पर सन्मान हे संस्कार या प्रार्थनेतून घडतात. ही सामुदायिक प्रार्थना माणसाला माणूस म्हणून जगण्याची शिकवण देते.
सामुदायिक प्रार्थना राष्ट्रीयतेचीही दिव्य अनुभूती देते. देशाच्या प्रगतीसाठी आणि राष्ट्राच्या ऐक्यासाठी नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, जबाबदारी आणि समर्पणभाव असणे आवश्यक आहे. सामुदायिक प्रार्थना व्यक्तीला “मी” पासून “आपण” पर्यंत घेऊन जाते. येथे जाती धर्मापेक्षा देश अधिक महत्त्वाचा मानला जातो. राष्ट्रहित, समाजहित आणि विश्वहित ही भावना जागृत करण्याचे सामर्थ्य या सामुदायिक प्रार्थनेमध्ये आहे. त्यामुळे सामुदायिक प्रार्थना ही राष्ट्रीय एकात्मतेचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणारी आहे.
चला तर मग दि.३० मे २०२६ रोजी सायं. ६ .३० वा. अमरावती येथील पंचवटी चौकात असलेल्या शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या स्मारकाजवळ संपन्न होत असलेल्या सामुदायिक प्रार्थनेत आपण आपल्या परिवारासह सहभागी होऊ या आणि आपले जीवन कृतार्थ करू या.
गुरुदेव भक्त व निवेदक
श्रीकृष्ण पखाले
अमरावती.
भ्र.ध्व.९४२०४०५६०७