
नाशिक:-( प्रतिनिधी )सुंदर आणि निरामय जग दाखवणाऱ्या जन्मदात्या मातेचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. आईची जागा दुसरे कोणीही घेऊ शकत नाही. मातेचे संस्कार ही आपल्या आयुष्यभराची महान शिदोरी आहे, असे उदगार रोटरी हेल्थ सोसायटीच्या कार्याध्यक्षा शर्मिला मेहता यांनी काढले l.
गिरणा गौरव प्रतिष्ठान संचलित महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या वतीने नाशिकच्या ग्रामसेवक भवनात मातृदिनानिमित्त आयोजित ‘आदर्श माता सन्मान सोहळ्या’प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी उपाध्यक्षा निर्मलाताई खर्डे होत्या. मंचावरग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष प्रमोद ठाकरे, भारती निकम, शीतल कुयटे, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर उपस्थित होते.
मेहता पुढे म्हणाल्या की, आई आपल्या बाळाला नऊ महिने, नऊ दिवस आपल्या गर्भात वाढवते, त्याला जोपासते. जन्मानंतर लहानचं मोठं करून त्याला स्वतःच्या पायावर उभं करते. आईच्या कष्टाचा, तिच्या संस्कारांचा आणि नि:स्वार्थ प्रेमाचा हा प्रेरणादायी सन्मान प्रत्येकाने काळजात जपून ठेवावा असाच आहे, असेही त्या म्हणाल्या.
मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि ज्यांच्या कन्या-पुत्रांनी विविध क्षेत्रात काम करताना आदर्श निर्माण केला; अशा शांताबाई थवील (सुरगाणा), फुलाबाई चौधरी (दिंडोरी), सुशीला आहेर (देवळा), रेश्माबाई देवरे (चांदवड), प्रा.सुमती पवार (नाशिक), कलाबाई पवार (कळवण), कमलाबाई गवळी (पेठ), सुमनबाई डुंबरे (सिन्नर), नंदाबाई नवाळे (चिंचोली), लीलावती शेलार (मालेगाव), लताबाई शेवाळे (सटाणा), शमा शेख (इगतपुरी), सुशीला संकलेचा (नाशिक), सुलाबाई बोरसे (त्र्यंबकेश्वर), अलका दराडे (नाशिक), चंद्रकला कोल्हे (येवला), रत्नमाला दुधे (नाशिक), सुमनताई डंबाळे (निफाड), सुनीता महाले (नांदगाव) यांचा ‘स्वयंसिद्धा शकुंतला कृतज्ञता आदर्श माता पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला.
प्रमोद ठाकरे यांनी आपल्या मनोगतात आई-वडिलांचे संस्कार, त्यांनी केलेले मार्गदर्शन हेच भविष्य घडविण्यासाठी उपयोगी ठरते, अशी भावना व्यक्त केली. तर शीतल कुयटे यांनी आईच्या काळजातून निघालेला प्रत्येक शब्द हा मानवी कल्याणासाठी उपयुक्त असतो. आई-वडिलांशिवाय हे जग अपूर्ण आहे. जगण्याची परिभाषा आपल्याला जर कोणी देत असेल किंवा शिकवत असेल तर ते फक्त आई-वडील असतात, असे विचार मांडले. कार्यक्रमाध्यक्षा निर्मलाताई खर्डे यांच्यासह भारती निकम, रवींद्र मालुंजकर यांनीही मनोगत व्यक्त केले. शिवशाहीर स्वप्निल डुंबरे यांच्या प्रबोधनात्मक सादरीकरणाने आणि शिवव्याख्याते प्रा.जावेद शेख यांच्या मातृकवितेने कार्यक्रमात रंग भरला.
प्रारंभी गिरजा महिला मंचच्या सदस्या आणि आदर्श मातांच्या कुटुंबीयांनी सन्मानार्थी मातांचे औंक्षण आणि चरणपूजा केली. ‘गोदावरीची पत्रवारीकार’ दत्तात्रय कोठावदे यांनी ‘मातेस पत्र’ सादर करत सर्वांची मने जिंकली. प्रास्ताविक सविता दरेकर आणि सूत्रसंचालन सविता वैद्य यांनी केले. आभार संगीता महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशा गोवर्धने, जयश्री क्षीरसागर, दामिनी गांगुर्डे, सुनंदा पाटील यांनी परिश्रम घेतले.
