
ओझर: (वार्ताहर) १४ मे स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र शंभुराजे भोसले यांचा जन्म दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात बलिदान दिन म्हणून साजरा केला जातो. एच ए एल कामगार अंतर्गत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जवळपास ३० रक्त दात्यांनी रक्तदान करून शंभूराजेंना आदरांजली वाहिली. तसेच देश विदेशातील व प्राचीन भारतीय राजवटींमध्ये ऐतिहासिक नाणी, सनदा, हस्तलिखिते, शिवकालीन शस्त्र अस्र यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. सायंकाळी शंभूराजेंच्या प्रतिमेचे पूजन करून ओझरच्या सहकार महर्षी माधवराव बोरस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांचे शंभू चरित्रावर व्याख्यानाचे आयोजन केले. ते पुढे म्हणाले जन्मापासूनच बालवयात आईच्या दुधापासून सुरू झालेला संघर्ष पुढे अखेर पर्यंत बलीदानाने संपला. अतोनात छळ करून त्यांचा वध करण्यात आला परंतु हिंदवी स्वराज्याचा छत्रपती संकटातही मृत्यूला कसा धीरोदात्तपणे सामोरा जातो हे साऱ्या जगाला दाखवून दिले. कार्यक्रमासाठी मराठा महासंघ व एच ए एल कामगार युनियनचे सर्वच पदाधिकारी व परिसरातील नागरिक सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन शिंदे यांनी केले तर आभार अध्यक्ष अशोक शिंदे यांनी मानले.
