
नाशिक:-(.प्रतिनिधी ) समर्थ रामदास यांनी लिहिलेली आणि मारुतीचे गुणगान करणारी एकूण तेरा स्तोत्रे आज उपलब्ध आहेत. समर्थांच्या सर्वसामान्य भक्तांना माहीत असणाऱ्या ‘भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती…’ या स्तोत्रात भक्तिरूप मारुतीचे यथार्थ दर्शन घडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका रजनी अनंत वाणी यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ते ‘विवेचनात्मक प्रभावी मारुती स्तोत्र’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होत्या. अध्यक्षस्थानी गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा होते. रजनी वाणी पुढे म्हणाल्या की, या मारुती स्तोत्राच्या पठणाने भक्तांना निश्चितच फायदा होतो. अंतःकरणात श्रद्धा ठेवून हे स्तोत्रपठण केल्यास आत्मशक्ती जागृत होते. या स्तोत्रात समर्थांनी मारुतीरायाच्या जीवनातील विविध गोष्टी सांगितल्या आहेत. सांसरिक जीवनात स्थैर्य प्राप्त करण्यासाठी या स्तोत्रातील भावना महत्त्वपूर्ण आहेत, असे सांगून त्यांनी मारुती स्तोत्राचे विश्लेषण केले. कविता कासार आणि सुनंदा पाटील यांना ग्रंथभेट देण्यात आली. प्रारंभी नुकतेच दिवंगत झालेले सावानाच्या प.सा.नाट्यगृहाचे व्यवस्थापक जितेंद्र मालवीय यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्राचार्य राजेंद्र देसले यांनी आभार मानले. सुशीला पिंपरीकर यांनी स्वागत केले. ज्येष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या शुक्रवारी (१५) ‘युरोप दर्शन’ या पुस्तकावर सेवानिवृत्त प्राचार्य अनंत गोविंद वाणी ऐसपैस गप्पा करणार आहेत.
