
संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांच्या हस्ते प्राचार्यां डॉ. दिलीप शिंदे यांचा सन्मान करताना उपस्थित मान्यवर महाविद्यालय विकास समिती प्रमुख डॉ संतोष तांबे व प्राध्यापक
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, समाजश्री प्रशांतदादा हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, नाशिक येथील प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांच्या सेवानिवृत्तीचा सोहळा नुकताच उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. गेल्या ३० वर्षांपासून मराठा विद्या प्रसारक संस्थेमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून, मागील तीन वर्षांपासून त्यांनी या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्य करत संस्थेच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलला. याप्रसंगी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांनी प्राचार्यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधान लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. यादव यांनी प्राचार्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या दीर्घकालीन सेवेमुळे संस्थेची उंची वाढल्याचे सांगितले. त्यांनी प्राचार्यांच्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा विशेष उल्लेख केला.तसेच, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष डॉ. संतोष तांबे यांनी आपल्या मनोगतात प्राचार्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा व निर्णयक्षमतेचा गौरव करत, त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधल्याचे नमूद केले.
आय क्यू ए सी (IQAC) विभाग प्रमुख डॉ. चेतन बागुल यांनी आपल्या मनोगतात प्राचार्यांच्या नेतृत्वगुणांचा, संघभावनेला दिलेल्या प्रोत्साहनाचा तसेच महाविद्यालयातील विविध कार्यक्रम, उपक्रम व आयोजनांमध्ये त्यांच्या सक्रिय सहभागाचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात शिस्त, गुणवत्ता आणि समन्वय यांचा उत्कृष्ट समतोल साधला गेला, असे त्यांनी नमूद केले. यावेळी रिसर्च विभाग प्रमुख डॉ. दीपा अभोणकर यांनी आपल्या भावना व्यक्त करत, “प्राचार्य डॉ. शिंदे यांचे प्रेरणादायी नेतृत्व आणि सहकार्याची भावना हि आम्हास सदैव लाभदायक ठरली.
यावेळी प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी आपल्या मनोगतात संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, आपल्या कार्यकाळात साथ देणाऱ्या सर्व सहकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानले. संस्थेने दिलेल्या संधीमुळेच आपल्याला विविध उपक्रम राबवता आले, असे सांगत त्यांनी संस्थेचे आणि सहकाऱ्यांचे ऋण मान्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. प्रवीण शेगावकर यांनी प्रभावी शैलीत केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. गौरी राठी यांनी आभार प्रदर्शन केले.
