
नाशिक:(प्रतिनिधी)- यशस्वी होण्यासाठी माणसाला शिक्षणाची आवश्यकता असते. शिक्षण हाच माणसाचा तिसरा डोळा असतो. जग बघण्याची दृष्टी शिक्षणामुळेच मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका उषा शिरसाठ यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात २४६वे पुष्प गुंफताना त्या ‘शेवंती चाफा’ या पुस्तकावर गप्पा करत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम ढिकले होते.
शिरसाठ पुढे म्हणाल्या की, मानवी मनातील भाव-भावनांची उत्कट अनुभूती प्रत्येक कथेमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सेवानिवृत्तीनंतर आलेले अनुभव जरा क्षणभर थांबशील का, बक्षीस, डॉक्टर, अंधारलेला दिवस, रात्रीची सळसळ, इंजिनिअर, हिरवी माय, शेवंती चाफा या कथांमध्ये व्यक्त केले आहेत. मानवी जीवनातील विविध प्रसंग अचूकपणे टिपत या कथासंग्रहाला आकार दिला आहे, असेही त्या म्हणाल्या.
डॉ.तेजस्विनी कदम आणि प्राचार्य यू.के.अहिरे यांना ग्रंथभेट देण्यात आली. योगाचार्य अशोक पाटील यांनी आभार मानले. मधुकर गिरी यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या शुक्रवारी (१०) सोनल दाते ‘ग्रामरंग’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
