
सिन्नर (प्रतिनिधी ) शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करणाऱ्या सिन्नर येथील सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या वतीने नुकतीच संगमनेर येथे महत्त्वपूर्ण सदिच्छा भेट घेण्यात आली. संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख आणि भावी विकासकामांच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे साहेब व नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. श्री. सत्यजित (सत्यजितदादा) तांबे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
“शैक्षणिक वाटचालीवर सविस्तर चर्चा”
या भेटीदरम्यान संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री.नामदेव लोणारे सीएसआर समितीचे अध्यक्ष मा.श्री. दत्तात्रय गोळेसर आणि प्रा.अनिल गोसावी यांनी तांबे पिता-पुत्रांशी संवाद साधला. संस्थेमार्फत राबविण्यात येणारे नवनवीन शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि शाळेच्या पायाभूत सुविधांच्या विस्ताराबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
विशेषतः दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सिन्नर तालुक्यातील पहिल्या महिला महाविद्यालयाच्या वाटचालीबाबत यावेळी आवर्जून चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या या महाविद्यालयाने अल्पकाळात केलेल्या प्रगतीचे तांबे परिवाराकडून कौतुक करण्यात आले. महिला महाविद्यालया संदर्भात भविष्यातील गरजांबाबत देखील यावेळी सविस्तर चर्चा झाली.
“आम्ही सदैव संस्थेच्या पाठीशी” – तांबे साहेबांचा विश्वाससगर विद्या प्रसारक संस्थेचे कार्य बघून डॉ. सुधीर तांबे आणि आ. सत्यजित तांबे यांनी समाधान व्यक्त केले. "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी संस्था जे कष्ट घेत आहे, ते कौतुकास्पद आहे. संस्थेच्या प्रत्येक शैक्षणिक व विकासकामात आम्ही खंबीरपणे सोबत आहोत," असा शब्द यावेळी दोन्ही नेत्यांनी दिला.या आश्वासनामुळे संस्थेच्या आगामी प्रकल्पांना मोठी गती मिळणार असून, तांबे साहेबांचे मार्गदर्शन आणि सहकार्य संस्थेसाठी ऊर्जा देणारे ठरेल, असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला. या भेटीमुळे सिन्नरच्या शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
