
(गणतंत्र न्यूज)
नाशिक (प्रतिनिधी)गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या मानाच्या गिरणा गौरव पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आल रविवारी महाकवी कालिदास कलामंदिरात संपन्न झालेल्या भव्य सोहळ्यात महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भगीरथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला मेडीनोवा हॉस्पिटलचे संचालक डॉ.निखिल भामरे, एमव्हीजी ग्रुपचे संचालक शरद देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती
आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे (पुणे), न्यूज१८ लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार विलास बडे (मुंबई), नाशिक मर्चंट बँकेचे व्हा.चेअरमन प्रकाश दायमा (लासलगाव), समाजसेवक रतन चौधरी (सुरगाणा), लोकनियुक्त सरपंच वर्षा ठाकरे (धुळे), शैलेंद्र सोनजे (मालेगाव), मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे (दिंडोरी), योगाचार्य प्रज्ञा पाटील (नाशिक), सटाणा मर्चंट बँकेचे व्हा.चेअरमन प्रकाश सोनाग्रा यांना सन्मानचिन्ह आणि मानपत्र स्वरूपात गिरणा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. दत्तात्रय वारे आणि विलास बडे यांनी सत्काराला उत्तर दिले. नाशिकमध्ये संपन्न झालेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष ॲड.नितीन ठाकरे, पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ तारपावादक भिकल्या धिंडा, तमाशासम्राट रघुवीर खेडकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. डॉ.निखिल भामरे, शरद देवरे यांनीही मनोगत व्यक्त केले गोदाआरतीने प्रारंभ झालेल्या सोहळ्याच्या सुरुवातीला गिरजा महिला मंचच्या सदस्यांनी दीपप्रज्वलन केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी पुरस्कार सोहळ्याची रंगत वाढवली गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी स्वागत, कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर यांनी प्रास्ताविक केले. सविता वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती हाडस यांनी आभार मानले. चतुरस्त्र अभिनेते राजेंद्र उगले यांनी पसायदान सादर केले.
डॉ.सुधीर गव्हाणे-जग आज युद्धामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेतून जात आहे. अशावेळी शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्ध, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचत आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबतची साक्षरता निर्माण व्हायला हवी. समाजाचं आजारपण दूर करणारे हॉस्पिटल हवे.
ॲड.भगीरथ शिंदे-समाजात रात्रंदिवस काम करत आयुष्यभर कष्ट, त्याग आणि समर्पण ज्यांनी केलं आहे; त्यांचा सन्मान होतोय, हे आनंददायी आहे. समाजाला दिशा देण्याचं काम अशी ध्येयवादी माणसे करत असतात. शिक्षणाच्या संदर्भात आजही अनास्था आहे. त्याबद्दलही विचार करणं गरजेचं आहे. पुस्तकावर बोलू काही, शेकोटी संमेलन असे विविध उपक्रम राबविणाऱ्या गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या कार्याचा आवाका फार मोठा आहे.
