प्राचार्य डॉ.किशोर पवार यांच्या अमृत महोत्सवात ॲड.नितीन ठाकरे यांचे गौरवोदगार

ज्येष्ठ विज्ञान साहित्यिक प्राचार्य डॉ.किशोर पवार यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात डॉ.पवार आणि प्रा.नलिनी पवार लिखित विविध ग्रंथांसह स्वरा निकम हिच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे. समवेत डावीकडून प्रकाशक विलास पोतदार, दत्तात्रय बच्छाव, प्रा.नलिनी पवार, प्राचार्य डॉ.किशोर पवार, स्वरा निकम, ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे, ॲड.दिनकर निकम आणि अलका निकम
नाशिक( प्रतिनिधी ):- शिक्षण क्षेत्रासह अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक जाणिवा तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या व्याख्यान आणि पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले
प्राचार्य डॉ.किशोर पवार म्हणजे ‘सार्थक’ जीवनाचा आदर्श वस्तुपाठ आहेत, असे गौरवोदगार मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी काढले.ज्येष्ठ विज्ञान साहित्यिक प्राचार्य डॉ.किशोर पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित पुस्तक प्रकाशन आणि गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ॲड.ठाकरे बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार आणि देशदूतचे संपादक शैलेंद्र तनपुरे, बच्छाव क्लासेसचे संचालक दत्तात्रय बच्छाव, प्रकाशक विलास पोतदार यांच्यासह प्राचार्य डॉ.किशोर पवार आणि प्रा. नलिनी पवार मंचावर उपस्थित होते.ॲड.नितीन ठाकरे पुढे म्हणाले की, मविप्र संस्थेत प्राध्यापक आणि प्राचार्य अशी ४२ वर्षांची प्रदीर्घ सेवा करणारे प्राचार्य डॉ.पवार यांनी आपल्या कार्यकाळात अनेक उपक्रम राबवत संस्थेत आदर्श कार्य उभे केले. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात ते सातत्याने अग्रेसर राहिले. ‘सार्थक’ या त्यांच्या आत्मचरित्रासह प्रकाशित झालेल्या तिन्ही प्रवासवर्णनात त्यांच्या एकूण कार्याचा आवाका मोठा असल्याचे दिसून येते, असेही ते म्हणाले.पुणे येथील वैशाली प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या प्राचार्य डॉ.किशोर पवार यांच्या ‘सार्थक’ या आत्मचरित्रासह डॉ.पवार आणि प्रा.नलिनी पवार लिखित ‘चला जग फिरूया,’ ‘चला जग पाहूया,’ ‘करूया जगाची सफर’ या तीन प्रवासवर्णनांचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डॉ.पवार यांची नात स्वरा नितीन निकम हिच्या ‘वर्स्ट समर’ या इंग्रजी पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे म्हणाले की, सार्थक हे डॉ.पवारांचे आत्मचरित्र म्हणजे प्रांजळ जाणिवांचा लेखाजोखा आहे. तसेच त्यांच्या प्रवासवर्णनात त्यांनी पाहिलेली ठिकाणे, अनुभवलेली तेथील सर्वांगीण माहिती नव्याने प्रवास करणाऱ्यांसाठी दिशादर्शक आहे, असे मत मांडले. दत्तात्रय बच्छाव आणि विलास पोतदार यांनीही छोटेखानी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार आणि ‘महासागर’चे नाशिक आवृत्तीचे संपादक प्रा.जयंत महाजन, बिटको महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कृष्णा शहाणे, प्रा.डॉ.अजिनाथ नागरगोजे, प्रा.नलिनी पवार यांनीही प्राचार्य डॉ.पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवलेआजपर्यंतच्या वाटचालीत अनेकांचे मिळालेले मार्गदर्शन आणि त्यातून जीवनाची झालेली ध्येयनिष्ठ वाटचाल याबद्दल समाधान व्यक्त करत अमृत महोत्सवानिमित्त प्राचार्य डॉ.किशोर पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. प्राचार्य डॉ.पवार यांच्या नाती स्वरा निकम, आराध्या पवार, रसिका पवार, डॉ.मृण्मयी जगताप, जावई डॉ.सुनील जगताप, नितीन निकम, यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह प्राचार्य डॉ.किशोर पवार यांचे आप्तेष्ट आणि मित्रपरिवार उपस्थित होते. डॉ.अमरजा जगताप, पूर्ती निकम, राहुल पवार, वैशाली पवार यांनी संयोजन केलेप्रा.सोमनाथ घुले यांनी प्रास्ताविक तर डॉ.सुनील जगताप यांनी आभार मानले. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.
