
नाशिक ( प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्था म्हणजे एक वैचारिक, सांस्कृतिक, गुणवत्ता, नैतिकता, शिस्त आणि पारदर्शकता आणि जीवनाला एका योग्य प्रवाहात आणण्याची गंगा आहे आणि याच गंगेचे पवित्र राखण्यासाठी विद्यार्थी हेच आपले दैवत समजून मराठा विद्या प्रसारक समाजाच्या या ज्ञानाच्या कुंभात उद्याचा आदर्श नागरिक तयार करण्यासाठी दिखाऊ नवे तर प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत हीच खरी कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक श्री सयाजीराव गायकवाड यांनी केले .ते जनता विद्यालय गांधीनगर विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांच्या जयंती तथा प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी श्री . डॉक्टर गायकवाड पुढे म्हणाले की, कर्मवीरांनी संस्थेच्या विकासासाठी आपले आयुष्य खर्च केले म्हणूनच आज या संस्थेचा गुणवत्ता ,शिस्त आणि नैतिकतेचा घडलेला विद्यार्थी भारतात नव्हे तर जगभरात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे ही संस्थेच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब असून हे सर्व श्रेय संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आहे आणि हीच परंपरा आपण सर्वांनी जोपासावी आणि संस्थेचे नाव सातासमुद्रा पार करावे असे आव्हान डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी केले.

आजची शिक्षण पद्धत शैक्षणिक धोरण बदलती समाज व्यवस्था बदललेल्या विद्यार्थी या सर्व गोष्टींचा मेळ घालून मराठा विद्या प्रसारक समाजाचा प्रत्येक शिक्षक आपला विद्यार्थी आजच्या युगात कसा प्रभावी व्यक्तिमत्व घेऊन बाहेर पडेल यासाठी काळजी घेतो ही अभिमानाची बाब आहे. असे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विवेक पवार यांनी केले .याप्रसंगी कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
