
सिन्नर ( प्रतिनिधी ) सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक संकुलातील उच्च माध्यमिक विभागाच्या उपशिक्षिका तथा गुणवत्ता संवर्धन समितीच्या अध्यक्षा सौ. अलका मिलिंद खैरनार या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि आदर्श सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा सेवापूर्वी सन्मान सोहळा सोमवार, दि. ३० मार्च २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नामदेव प्रताप लोंढे हे विराजमान होते. कार्यक्रमास संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. नामदेव विष्णू लोणारे, मा.श्री.दत्तात्रय दादा लोंढे (उपाध्यक्ष), मा.श्री. संजय विष्णूपंत माळी (सह-सेक्रेटरी), मा.श्री. रामनाथ दत्तात्रय बलक (खजिनदार), मा.श्री. दत्तात्रय पांडुरंग गोळेसर (अध्यक्ष, C.S.R. समिती), मा. सौ.मंगलताई श्याम झगडे (अध्यक्षा, शालेय समिती माध्यमिक विभाग), मा.श्री.दिंगबर रामभाऊ पगर (अध्यक्ष, शालेय समिती प्राथमिक विभाग), संस्थेचे संचालक मा.श्री.सुधाकर लक्ष्मण गोळेसर, मा.श्री.मधुकर किसन खर्जे, मा.श्री.जुगल भागीनाथ गवळी, यांच्यासह संकुलाचे माजी प्राचार्य श्री. रामनाथ लोंढे, खैरनार परिवार आणि त्यांचे पाहुणे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे प्राचार्य श्री. मधुकर देशमुख यांनी करत सौ. खैरनार मॅडम यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, संस्थेप्रती असलेली निष्ठा आणि शैक्षणिक बांधिलकी यांचा विशेष उल्लेख केला.
अध्यक्षीय मनोगतात मा. श्री. नामदेव विष्णू लोणारे यांनी सौ.अलका खैरनार यांनी आपल्या ३४ वर्षांच्या सेवेत संस्थेचे नाव उंचावले आहे. मराठी विषयावर असलेले त्यांचे प्रभुत्व, प्रचंड वाचनाची सवय, वेळेचे काटेकोर पालन आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार त्यांनी स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा करत संगणकीकरणासारखे नवे तंत्रज्ञान आत्मसात केले. कडक शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत इतर शिक्षकांसाठी आदर्शवत आहे. सॊ.खैरनार या एक प्रोफेशनल शिक्षक होत्या, त्यांच्या कार्याचा ठसा संस्थेच्या इतिहासात कायम राहील.
खजिनदार मा. श्री. रामनाथ दत्तात्रय बलक यांनी आपल्या मनोगतात सौ. खैरनार मॅडम यांच्या प्रामाणिकपणा, शिस्तप्रियता आणि संस्थेच्या हितासाठी केलेल्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा असे सांगितले.
संचालक मा. श्री. जुगल भागीनाथ गवळी यांनीही सौ. खैरनार मॅडम यांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य प्रा.श्री.एकनाथ माळी यांनी आपल्या मनोगतात सौ. खैरनार मॅडम यांच्या उच्च माध्यमिक विभागाच्या सुरुवातीपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेताना त्यांच्या नेतृत्वगुणांचा व गुणवत्ता संवर्धन समितीच्या माध्यमातून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. त्यांनी मॅडम यांच्या कार्यतत्परतेचे, विद्यार्थ्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचे आणि विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, मूल्ये आणि अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी केलेले योगदान अधोरेखित केले. तसेच बदलत्या काळानुसार स्वतःला अद्ययावत ठेवण्याच्या वृत्तीचे कौतुक केले.
यावेळी संस्थेचे शिक्षणाधिकारी तसेच सौ. खैरनार मॅडमचे माजी विद्यार्थी प्रा. श्री. राहुल वरंदळ, पर्यवेक्षिका सौ. काठे मॅडम आणि मुख्याध्यापिका सौ. राजगुरू मॅडम यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यांनी सौ. खैरनार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या शैक्षणिक संस्कारांचा उल्लेख करत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी, सत्काराला उत्तर देताना सौ. अलका मिलिंद खैरनार यांनी संस्थेने दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “या संस्थेमुळे मला माझे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. सहकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच माझा हा प्रवास यशस्वी झाला,” असे भावनिक शब्दांत त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमोल आंबेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.गौरी मोरे यांनी मानले.
