
कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या जयंती निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करताना मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व शिक्षक वृंद.
नांदगाव :– मविप्र संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात ‘मविप्र’ संस्थेचे माजी सरचिटणीस कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपशिक्षिका शितल तासकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात वसंतराव पवार यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. “कर्मवीरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांचा त्याग आणि दूरदृष्टी आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “केवळ पुस्तकी ज्ञान मिळवणे पुरेसे नाही, तर कर्मवीरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिस्त, गुणवत्ता, पारदर्शकता आणि कष्टाची तयारी ठेवली पाहिजे.”
या कार्यक्रमाला विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शरद आहेर यांनी केले.
