
वेहेळगाव ( प्रतिनिधी) क्रां. वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित माध्य. व उच्च माध्यमिक विद्यामंदिर वेहेळगाव ता. नांदगाव येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक श्री किशोर भाऊ लहाने साहेब तर प्रमुख मान्यवर म्हणून संचालक श्री टी. एम. डोंगरे सर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री डी. पी. थोरे सर, मजूर फेडरेशन अध्यक्ष श्री. गुलाब भाऊ भाबड साहेब, संस्थेचे शिक्षणाधिकारी श्री. जयवंत भाबड सर तसेच गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला सरस्वती माता व क्रां. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यालयातील गीत मंचाने पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री. एम. एस. पठाण सर यांनी प्रास्ताविक सादर केले. यात सन २०२५ -२६ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेले विविध उपक्रम, स्पर्धा, परीक्षा, कार्यक्रम यांची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यात मागील वर्षी इयत्ता १० वी व १२ वी मध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर शाळेमध्ये वर्षभर घेतल्या गेलेल्या विविध क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी श्री. हरीशभाऊ भाबड यांनी विद्यालयास १०० पुस्तके भेट दिली. दहावीच्या वर्गाचे वसंत पॅटर्न (जादा तास)चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री. जयवंत भाबड सर यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे मत मांडले तर श्री. डोंगरे सर यांनी विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनामध्ये शिक्षकांबरोबर पालकांची भूमिका महत्त्वाची असते, असे सांगितले. श्री. किशोर भाऊ लहाने यांनी आपल्या भाषणात प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्याला यश नक्कीच मिळते असे थॉमस एडिसन या शास्त्रज्ञाच्या उदाहरणावरून स्पष्ट केले. कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. डी. पी. थोरे सर, श्री. प्रमोद(गुलाब)भाऊ भाबड, श्री. पोपटराव सानप, श्री. निळूमामा सानप, श्री. दादाभाऊ चकोर आदी मान्यवर व पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दत्ता नागरे सर तर आभार प्रदर्शन श्री. संजय डोमाडे सर यांनी केले. कार्यक्रमानंतर शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
