

लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक
॥आत्मा मालिक॥ गुरु ओम् गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक-२४जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुध्द ॥१॥ न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥२॥ जाति वित्त गोत कुळशीळ (कुलशील) मात । भजकां त्वरीत भावना युक्त ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनी घर केलें ॥४॥ या अभंगात जप, तप, कर्म, क्रिया, नेमधर्म यांचे फळ सांगीतले आहे। जपतपादि सर्व साधनांचे फळ एकच आहे, सर्वांघटी राम आहे अशी प्रतिती येणे। सर्वा घटी म्हणजे सर्वांच्या शरीरात। सर्वात एकच परमेश्वर आहे ही दृष्टी झाली म्हणजे “परस्पर देवो भव” याचे रहस्य समजते। आपण प्रत्येकात परमेश्वर आहे असे पक्के समजून एकमेकाला वंदन करावे ही सिध्द-संतांची शिकवण आहे। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ॥१॥ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा॥२॥ कोण्याही जीवाचा (भूताचा) न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचे॥३॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख भोग जीव पावे॥४॥विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ॥१॥ आईका जी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा॥२॥ कोणाही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचे॥३॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुख दु:ख जीव भोग पावे॥४॥(२१) जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत। हा भक्तियोग निश्चित जाण माझा॥ज्ञानेश्वरी-१०-११८॥न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी- संशय टाकून शुध्द भावाने रामकृष्णी टाहो फोड। टाहो फोडणे म्ह्णजे अट्टाहासाने नाम घेणे। या नित्य रामकृष्णी टाहो फोडण्यानेच “सर्वाघटी राम” हा भाव उत्पन्न होतो। जाति वित्त गोत कुळशीळ (कुलशील) मात । भजकां त्वरीत भावयुक्त- भक्ती करण्यात जातीचा अभिमान, कुळ शीळ द्रव्य यांचा अभिमान घातक आहे। परमेश्वराजवळ या अभिमानाला जागा नाही। कोणताही अभिमान न बाळगता ईश्वरभक्ती केली पाहिजे।ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनी घर केलें- ज्ञानेश्वर महराज म्हणतात, माझ्या ध्यानी मनी, ध्यानात आणि मनात फक्त रामकृष्णच आहे। त्यामुळे मी विकुंठभुवनी च माझे घर केले आहे। ज्याचे ध्यानी मनी ईश्वराशिवाय काहीच नसते त्याने वैकुंठ भुवन हेच घर केले असे समजावे. “यद्गत्वा न निवर्तन्ते तध्दाम परमं मम॥ भगवद्गीता॥” ज्या ठिकाणी गेले असता मनुष्य पुन्हा दु:खमय संसारात मृत्युलोकात परत येत नाही, पुन्हा कधीही दु:ख बंधनात पडत नाही, तेच माझे परमधाम आहे। [17-01-2023]
