
नाशिक (प्रतिनिधी) :
साहित्य, संगीत आणि भावविश्व यांची सुंदर सांगड घालत विश्वास ग्रुप व महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा जलालपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गझल मैफिल’ नुकतीच उत्साहात संपन्न झाली. सावरकरनगर येथील विश्वास हबमध्ये रंगलेली ही मैफिल म्हणजे रसिकांसाठी शब्दांचा अविस्मरणीय उत्सव ठरला. ‘गझल विश्वास’च्या या ३६व्या पुष्पाने उपस्थितांच्या मनात भावनांचे तरंग निर्माण केले.

या उपक्रमामागे विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास लीलावती जयदेव ठाकूर यांची संकल्पना असून, ‘ग्रंथ तुमच्या दारी’चे विनायक (आशा) पुरुषोत्तम रानडे, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज कमल एकनाथ शिंपी, तसेच रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता पार्थ महाजन, ठाकूर यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे समन्वयन संजय सुभद्रा नानासाहेब गोरडे यांनी समर्थपणे सांभाळले.
मैफिलीची सुरुवात होताच गझलकारांच्या ओळींनी वातावरणात एक वेगळीच भावछटा निर्माण केली. अजय बिरारी यांनी आठवणींच्या कोमल धाग्यांना स्पर्श करत
“समजला मला हा तुझा धूर्त कावा, नको मीठ चोळू जुन्या त्याच घावा…”
अशा ओळींतून हळव्या भावनांचा हिशोब मांडला.
सुरेश चौरे यांनी प्रेमाच्या ऊबदार स्मृती जागवत
“केवढी ऊब मला द्यायची ती, गोधडीला जरी ठिगळ होते…”
अशी साधी पण मनाला भिडणारी अभिव्यक्ती सादर केली.
अरुण इंगळे यांनी समाजातील दांभिकतेवर तीक्ष्ण भाष्य करत
“उजळपणावर मरते हे जग, कुठवर मी मग उन्हात राहू…”
अशा ओळींमधून वास्तवाचे दर्शन घडवले.
जयश्री कुलकर्णी यांनी आधुनिक भावछटा टिपत
“जीवघेणा हा उन्हाळा, त्यात डीपी हॉट त्याचा…”
अशा हलक्या-फुलक्या शैलीत आजच्या नात्यांचे रंग उलगडले.
शुभांगी मिश्रा यांनी आशावादाचा सुर छेडत
“मानू नकोस उणे हे जीवनाचे गाणे, हे जन्मोजन्मीचे देणे… तू फुलपाखरू हो…”
अशा सकारात्मक भावनेने वातावरण भारावले.
जयश्रीताई कुलकर्णी यांनी जीवनातील द्वैत स्पष्ट करत
“सुख दुःख दोन बाजू आहेत या जगाच्या…”
अशी तत्वचिंतनात्मक जाणीव मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक विशाल टर्ले यांनीही आपल्या ओळींतून माणुसकीचे नाते जपले
“स्वभावाने मनामध्ये साठत असतात माणसं, आठवणीने उरामध्ये दाटत असतात माणसं…”
या मैफिलीने केवळ गझलांचे सादरीकरणच नव्हे, तर भावनांची देवाणघेवाण घडवून आणली. शब्दांच्या ओळींमध्ये दडलेले प्रेम, वेदना, आशा आणि वास्तव यांचा संगम रसिकांच्या मनाला स्पर्शून गेला.
विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे, शाखा जळालपूर), रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ आणि ‘ग्रंथ तुमच्या दारी’ यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेली ही गझल मैफिल नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात एक वेगळीच उंची गाठून गेली.
