
नाशिक (प्रतिनिधी)आयुर्वेदात पूर्वजांनी सांगितलेल्या वनस्पती आपल्या आजूबाजूला उपलब्ध असतात. त्यांचा उपयोग करून आपलं जीवन संपन्न केलं पाहिजे. कारण धावपळीच्या जीवनात आरोग्यदायी जीवनशैलीची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी केले.
कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात वैशाली प्रकाशन,पुणे प्रकाशित आणि सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.शोभा रवींद्र सातभाई यांच्या ‘आरोग्यदायी वनस्पती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिका शकुंतला वाघ, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, मविप्रचे माजी अध्यक्ष अरविंद कारे, शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.रवींद्र मोरे, ज्येष्ठ विज्ञान साहित्यिक प्राचार्य डॉ.किशोर पवार, स्थायी समितीचे माजी सभापती नानासाहेब महाले, प्रकाशक विलास पोतदार, लेखिका डॉ.शोभा सातभाई, रवींद्र सातभाई मंचावर उपस्थित होते.
ॲड.नितीन ठाकरे पुढे म्हणाले की, शास्त्रीय विवेचन ‘आरोग्यदायी वनस्पती’मध्ये अतिशय उपयुक्तरित्या मांडले आहे. त्यामुळे आपणही आरोग्याबाबत जागृत राहिलं पाहिजे, असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ साहित्यिका शकुंतला वाघ यांनी आपल्या मनोगतात अभ्यासपूर्ण संशोधनातून या पुस्तकाची निर्मिती लेखिकेने केली असल्याने दैनंदिन जीवनात या पुस्तकातील माहिती उपयोगी ठरेल, असे विचार मांडले. माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी बऱ्याच आरोग्यवर्धक गोष्टी या पुस्तकात असल्याचे मत मांडले. प्राचार्य डॉ.किशोर पवार यांनी हे पुस्तक म्हणजे आरोग्याचा अनमोल खजिना असल्याचे स्पष्ट केले. लेखिका डॉ.शोभा सातभाई यांनी ह्या पुस्तकाच्या निर्मितीचा आनंद वेगळा असल्याचे सांगून आरोग्यरूपी उपयुक्त धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. प्राचार्य चंद्रकांत कुशारे, सुरेश सादडे यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख संयोजक रवींद्र सातभाई यांनी स्वागत केले. आर.एम.मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.
