
नाशिक (प्रतिनिधी) : मनातली जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास यांचा त्रिवेणी संगम झाल्यावर अशक्य ही शक्य होत असते. याचीच प्रचिती नुकतीच नाशिककर कन्या असलेल्या मणिकर्णिका देशपांडे हिच्या कर्तृत्वाने आली आहे.
येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित , शिशु विहार मराठी माध्यमाची मोठ्या गटातील विद्यार्थिनी माणिकर्णिका प्रवर मोनिका देशपांडे, हिने उत्तराखंड राज्यातील ” केदारकंठ” हे शिखर दि. 19 ते 20 मार्च 2026 या कालावधीत सर केले.
12,500फूट एका बाजूने असे जाऊन येऊन 25,000 फूट समुद्रसपाटी पासूनच्या उंचीवर वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी हा विक्रम करणारी ती भारतातील पहिली आसामी ठरली आहे.
यापूर्वी हे शिखर 8 वर्षीय मुलगी व 7 वर्षीय मुलगा यांनी सर केले आहे.
अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितिचा सामना यावेळी माणिकर्णिका हिने केला. त्यात प्रचंड वेगाने वाहणारे वारे, पाऊस, हिमवर्षाव, हिमालयीन प्राणी यांचा सामना तिला करावा लागला.
मात्र, अत्यंत चिकाटी व सहनशक्ती यांच्या जोरावर तिने हे यश संपादित केले.माणिकर्णिका चे हे यश आजवरचे राष्ट्रीय रेकॉर्ड आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे समाजाच्या सर्वच स्थरांतून कौतुक होत आहे.
यासाठी तिला संस्था व शाळा यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले वातावरण, शिवम जाधव, रोहित पातळे , द सरचिंग सोल या कंपनीचे ट्रेक लीडर अभिषेक रावत व राममोहन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कसे आहे केदारकंठ
केदारकंठ हे उत्तराखंड राज्यातील हिमालय पर्वत रांगेतील हिमाचल हिमालय या पर्वत श्रेणीतील एक महत्वाचे गिरीशिखर आहे. ज्याची समुद्रसपाटी पासूनची उंची 12,500 फूट म्हणजेच 3,600 मीटर इतकी आहे. तसेच, येथे जुडा का तालाब या ठिकाणी महादेवांनी आपल्या जटा धुतल्या असल्याची आख्यायिका प्रसिद्ध असून हा पर्वत महादेवांचा कंठ म्हणून देखील ओळखला जातो.

मणिकर्णिकाला असे पार करावे लागले अडथळे
ट्रेकिंग च्या सुरवातीला मणिकर्णिकाला तिचे वय लहान असल्याने चढाई करण्यास मनाई करण्यात येत होती. मात्र, तिची दुर्दम्य इच्छाशक्ती पुढे कोणाचे काहीही चालेना. अखेर तिला परवानगी देण्यात आली. त्यांनतर प्रचंड वेगाने घोंघावनारे अतिशीतवारे, हिमालयीन प्राणी, आकाशातून सातत्याने होणारी बर्फवृष्टी, हिंस्त्र प्राणी यांसारख्या विविध समस्यांचा सामना यावेळी अवघ्या 6 वर्षांच्या मणिकर्णिका हिने मोठ्या धीराने केला.
