
नाशिक:- (प्रतिनिधी ) विचारवंतांनी मांडलेले विचार माणसाला नेहमी समृद्ध करत असतात. असे विचार पेरणारी वसंत व्याख्यानमाला हे नाशिकचे सांस्कृतिक वैभव आहे, असे प्रतिपादन वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘वसंत व्याख्यानमालेची शतकोत्तर वाटचाल’ या पुस्तकावर श्रीकांत बेणी बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक माजी आ.नानासाहेब बोरस्ते होते. श्रीकांत बेणी पुढे म्हणाले की, सन १९२२ मध्ये रावसाहेब वझे यांनी वसंत व्याख्यानमालेची सुरुवात केली. पहिल्या वर्षी शंकराचार्य कु र्तकोटी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यानंतर सलग दहा वर्ष त्यांनी अध्यक्षपद भूषवले. वसंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून जगभरातील विविध विचारवंत, तत्त्वज्ञानी या मंचावर येऊन गेले. त्यामुळे गोदाकाठी वसंत व्याख्यानमालेला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत गेला. नाशिककरांना विविधांगी विचारांची मेजवानी देत अनेक साहित्यकांनी या व्याख्यानमालेला समृद्ध केले आहे. महाराष्ट्रातील ही सर्वार्थाने वेगळी अशी वसंत व्याख्यानमाला शंभर वर्ष पूर्ण करून आज १०२ वर्ष पूर्ण करत आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो,असेही ते म्हणाले. संगीता बाफना आणि हेमंत देवरे यांचा ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर मधुकर गिरी यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (दि.११) राजेंद्र गांगुर्डे हे ‘इरदडी’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.

