
हिमायतनगर (प्रतिनिधी) मौजे आंदेगाव ता. माहूर जि. नांदेड येथील गट क्रमांक 271 मधील 9.37 आर क्षेत्रफळाची देवस्थान जमीन दिनांक 20 मार्च 2026 रोजी लिलाव प्रक्रियेद्वारे देण्यात आली. सदर जमीन श्री क्षेत्र दत्त शिखर संस्थान माहूरगड यांच्या मालकीची असून गेल्या 60 ते 70 वर्षांपासून एका कुटुंबाकडून मक्तेदारी पद्धतीने कसली जात असल्याची माहिती आहे.
माहितीनुसार, संबंधित कुटुंबाने जमिनीवर कुळ हक्क मिळवण्याचा प्रयत्न करत मूळ अभिलेखांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयीन वाद निर्माण होऊन प्रकरण Bombay High Court येथेही दाखल करण्यात आले होते.
न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर सदर जमीन लिलावासाठी ठेवण्यात आली. या लिलावात घारापूरचे सरपंच गणेश खंडू पाळजकर यांनी ₹3 लाख 70 हजारांची विक्रमी बोली लावत जमीन आपल्या ताब्यात घेतली. या प्रक्रियेत सामाजिक कार्यकर्ते रामदास देवाना पोलसवाड यांनीही विशेष प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या चार पिढ्यांपासून संबंधित कुटुंबाकडे कसली जात असलेली ही जमीन लिलावाद्वारे परत देवस्थानच्या प्रक्रियेत येत नव्या धारकाकडे गेल्याने गावात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी “जुन्या मक्तेदारांच्या तोंडचा घास काढला” अशी भावना व्यक्त केली, तर अनेक ग्रामस्थांनी पारदर्शक लिलाव प्रक्रियेचे स्वागत केले.
लिलावात यश मिळवल्यानंतर सरपंच गणेश पाळजकर यांचा आंदेगाव व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. देवस्थानच्या उत्पन्नात वाढ करून नियमानुसार जमीन ताब्यात घेतल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
